शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांना ‘मोकका’ लावू – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

 

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येतील. अशी विक्री करणार्‍यांना वेळप्रसंगी ‘मोकका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लावू, असे आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत दिले. राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भात आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

आत्राम म्हणाले, “अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणार्‍या टपर्‍यांविरोधात कारवाई सतत चालू आहे. शाळांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाकडे ओढला जाऊ नये, याकरता विद्यार्थ्यांचे पालक, मुख्याध्यापक, शाळा कृती समितीचे पदाधिकारी यांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.”

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करीत असून तो अंतिम टप्प्यात आहे. तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण येईल. त्यातून अन्न आणि औषध प्रशासन विभागात मनुष्यबळ वाढवता येणार आहे.