हरियाणातील भाजप सरकार मंदिरांच्या देखभालीसाठी आणणार नवीन कायदा !
|
चंडीगड – हरियाणातील भाजप सरकार हिंदूंच्या मंदिरांसाठी नवीन कायदा अमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, ज्या गावांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अल्प हिंदू आहेत, त्या गावातील मंदिरांचे दायित्व सरकार घेणार आहे. यासाठी सरकार जिल्ह्यात मंडळ स्थापन करून जिल्हाधिकार्यांकडे दायित्व देण्यात येणार आहे. १२ जिल्ह्यांतील मंदिरांची दुरवस्था लक्षात घेऊन त्यांच्या देखभालीचे दायित्व सरकार स्वत: घेणार आहे.
सौजन्य state knowledge tv
राज्याच्या गृहविभागाने याविषयीच्या विधेयकाची सिद्धता पूर्ण केली आहे. आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार हे विधेयक मांडू शकते. हरियाणातील अनेक गावांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अल्प आहे किंवा हिंदू तेथून स्थलांतरित झाले आहेत. अशा परिस्थितीत मंदिरांची देखभाल योग्य प्रकारे होत नाही. विशेषत: नूहसारख्या जिल्ह्यातील मंदिरांची अवस्था बिकट आहे. अशा जिल्ह्यांतील मंदिरांसाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळात स्थानिक लोकांचाही समावेश असेल. सरकार प्रथम मंदिरांची दुरुस्ती करून घेईल; मग तिथे नियमित पूजेची व्यवस्था करेल. शिखांच्या धार्मिक स्थळांची देखरेख करण्यासाठी ‘हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. मुसलमानांच्या धार्मिक स्थळांची देखभाल ‘वक्फ बोर्ड’ करते. अशा स्थितीत हिंदूंच्या मंदिरांच्या देखभालीसाठी वेगळी समान व्यवस्था निर्माण करायला हरकत नाही, असे सरकारने म्हटले आहे.