Mahadev Betting App : ‘महादेव बेटिंग अॅप’चा मालक रवि उत्पल याला दुबईमध्ये अटक
नवी देहली – ‘महादेव बेटिंग अॅप’चा मालक रवि उत्पल याला दुबई येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात इंटरपोल पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस (जगभरातील पोलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हव्या असलेल्या फरार लोकांविषयी सतर्क करणे) प्रसारित केली होती. याच आधारे दुबई पोलिसांनी रवि उप्पल याला अटक केली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय यंत्रणा संयुक्त अरब अमिरातच्या संपर्कात आहेत. सौरव चंद्राकर आणि रवि उप्पल हे बेटिंग अॅप घोट्याळ्यातील मुख्य आरोपी आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) या दोघांचा शोध चालू होता.
सौरव चंद्राकर हा रायपूरमध्ये एक ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सहभागी झाला. सौरव आणि रवि यांच्याकडे ६ सहस्र कोटींहून अधिक संपत्ती असण्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून ही रोकड दुबईला पाठवण्यात आली. तपास यंत्रणांना संशय आहे की, दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून ‘महादेव अॅप’ला चालवण्यासाठी साहाय्य केले आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर या प्रकरणात आरोप
महादेव अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. छत्तीसगड विधानसभेच्या वेळी ईडीने ५ कोटी रुपये जप्त केले होते. या प्रकरणी ईडीने असीम दास याला अटक केली होती. असीम दास याने मान्य केले की, ही रक्कम छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतील खर्चासाठी नेली जात होती. ‘बघेल’ नावाच्या नेत्याला देण्यासाठी ही रक्कम नेली जात होती.
काय आहे महादेव बेटिंग अॅप ?
महादेव बेटिंग अॅप हा एक सट्टेबाजीचा अॅप आहे. यावर लोक ऑनलाईन सट्टेबाजी करत होते. या अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे; मात्र अन्य देशांमध्ये हे अॅप आजही चालू आहे. पोकर, कार्ड गेम, चान्स गेम, क्रिकेट, टेनिस, फुटबॉल यांच्या लाइव्ह खेळांमध्ये सट्टेबाजी करण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. ड्रॅगन टायगर, कार्ड यांचा उपयोग करून याद्वारे व्हर्चुअल क्रिकेट गेम किंवा भारतात होणार्या निवडणुकांवरही सट्टा लावण्याची सोय हे अॅप करून देते.