विधीमंडळात वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही इंद्रायणी नदी प्रदूषितच !
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
|
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) : ‘वारकर्यांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राचे वैभव असलेली इंद्रायणी नदी सध्या अत्यंत प्रदूषित झाली आहे. वारंवार विधीमंडळात प्रश्न उपस्थित करूनही अद्याप इंद्रायणी नदीचा विकास आराखडाही सिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी १३ डिसेंबर या दिवशी इंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करण्याची लक्षवेधी विधानसभेत उपस्थित केली. या वेळी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्याप प्रशासनाकडून इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याची कार्यवाही चालू झाली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
(सौजन्य : ABP MAJHA)
या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘इंद्रयणी नदी महाराष्ट्रासह भारताच्या अस्मितेचा विषय आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आळंदी येथे हरिभक्त परायण मंडळी उपोषणाला बसली होती. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कारणीभूत आहे. नदीच्या शेजारी असलेल्या अनधिकृत भंगाराच्या व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात यावी. भंगारात गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिकसारख्या वस्तू नदीकाठी जाळल्या जातात. ही रासायनिक द्रव्ये नदीत टाकली जात आहेत. महानगरपालिकेकडे विनंती करूनही या विरोधात कारवाई केली जात नाही. नदीमध्ये नाल्यांचे प्रदूषित पाणी थेट सोडले जात आहेत. वर्ष २०१४-१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना इंद्रायणी नदीला प्रदूषित करणार्यांवर कारवाईस प्रारंभ करण्यात आला; मात्र वर्ष २०१९ नंतर ही कारवाई थांबवण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ९९५ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. विकास आराखडा सिद्ध करून या कामाला तत्परतेने कार्यवाही करावी.’’
नदीकाठच्या २०-२५ गावांना प्रदूषित पाण्याचा त्रास ! – आमदार दिलीप मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
इंद्रायणी नदीच्या काठावर अनधिकृत गोदामे आहेत. यामध्ये विविध रसायनांचा साठा केला जातो. इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्याचा फटका काठावरील २० ते २५ गावांना बसत आहे. नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे शेतभूमी नापीक होत आहे, तसेच या परिसरात साथीचे रोग पसरले आहेत. आळंदी हे पवित्र स्थान आहे. ज्ञानेश्वर माऊलींना विठ्ठलाने इंद्रयणीच्या काठावर समाधी घेण्यास सांगितले. इंद्राच्या कमंडलूतील तीर्थाने ही नदी निर्माण झाल्याची आख्यायिका आहे. ज्ञानेश्वर माऊलींना श्रीविष्णूचे अवतार मानले जाते. अशा तीर्थक्षेत्रातील नदी प्रदूषित असणे हे सरकारसाठी योग्य नाही.
येत्या ३ मासांत विकास आराखडा सिद्ध करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
औद्योगिक विकास विभागाच्या क्षेत्रात अनधिकृत गोदामे असल्यास त्यांवर कारवाई केली जाईल. पुणे आणि आळंदी महानगरपालिका, औद्योगिक विकास मंडळ यासाठी एकत्रित काम करतील. इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ असलेले अनधिकृत व्यवसाय हटवण्याचा आदेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कार्यवाहीसाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. हे काम मोठे असून कामाला ३-४ वर्षे लागतील. येत्या ३ मासांत यासाठीचा विकास आराखडा सिद्ध केला जाईल.