छत्तीसगडमध्ये ७ वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या रवींद्र चौबे यांचा पराभव करणारे सर्वसामान्य कामगार असलेले भाजपचे ईश्वर साहू कोण आहेत ?
नुकताच छत्तीसगडच्या निवडणुकीचा निकाल लागला. छत्तीसगडमध्ये काँग्रेस अत्यंत मजबूत मानली जात होती; परंतु भाजपने भूपेश बघेल सरकार उलथवून टाकून मोठी उलथापालथ केली आणि सर्वांनाच धक्का दिला. सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल लागला, तो छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघात ! येथील एक कामगार ईश्वर साहू यांनी भाजपच्या बाजूने निवडणूक लढवत काँग्रेस सरकारचे कृषीमंत्री आणि ७ वेळा याच मतदारसंघातून निवडून आलेले रवींद्र चौबे यांचा पराभव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे ईश्वर साहू यांनी या निवडणुकीपूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या विजयाला ऐतिहासिक महत्त्व आले आहे. या निवडणुकीत भाजपला ५४, तर काँग्रेसला ३५ जागा मिळाल्या आहेत.
१. दंगलीत मुलाचे निधन झाल्यानंतर भाजपने ईश्वर साहू यांना दिली संधी !
साजा येथील भाजपचे ईश्वर साहू यांचा मुलगा एप्रिल २०२३ मध्ये साजा विधानसभा मतदारसंघातील जातीय दंगलीत मारला गेला. येथील स्थानिक शाळेत झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेचे नंतर जातीय दंगलीत रूपांतर झाले होते. या दंगलीत ३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये ईश्वर साहू यांचा मुलगा भुवनेश्वर याचाही समावेश होता. सरकारने ईश्वर साहू यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती; परंतु साहू यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला होता.
निवडणुकीच्या कालावधीत बेमेतरा आणि कवर्धा येथे झालेला जातीय हिंसाचार अन् तेथे होत असलेले धर्मांतर यांच्या सूत्रावर भाजपने आक्रमकता दर्शवली. या वेळी भाजपने रायपूरपासून ११० किलोमीटरवर असलेल्या बिरनपूर येथील ईश्वर साहू या कामगार असलेल्या व्यक्तीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. ईश्वर साहू यांनी साधी सरपंच पदाचीही निवडणूक लढलेली नाही. असे असूनही भाजपच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांनी रवींद्र चौबे यांच्यासारख्या प्रस्थापित आमदाराला पराभूत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साजामधील प्रचाराच्या वेळी ‘ईश्वर साहू हे केवळ उमेदवार नसून ‘न्यायासाठीच्या लढ्याचे प्रतीक’ आहेत’, असे म्हटले होते.
२. विद्यमान मंत्र्यांचा ५ सहस्रांहून अधिक मतांनी केला पराभव !
ईश्वर साहू यांनी ५ सहस्रांहून अधिक मतांनी विजय मिळवला. ईश्वर साहू यांना १ लाख १ सहस्र ७८९ मते, तर चौबे यांना ९६ सहस्र ५९३ मते मिळाली. दोघांमध्ये ५ सहस्र १९६ मतांची तफावत आहे.
३. लोकशाहीच्या लढाईत झालेल्या अन्यायाचा घेतला सूड ! – बी.एल्. संतोष, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप
साहू यांच्या विजयानंतर बी.एल्. संतोष यांनी ट्वीट केले, ‘हे ईश्वर साहू आहेत, ज्यांनी छत्तीसगडमधून काँग्रेसचे ७ वेळा आमदार राहिलेले रवींद्र चौबे यांचा पराभव केला. जमावाने केलेल्या हिंसाचारात त्यांचा मुलगा मारला गेला आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे दंगलखोरांना पाठिंबा दिला. आज त्यांनी लोकशाहीच्या लढाईत झालेल्या अन्यायाचा सूड घेतला. अभिनंदन !’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२३)