‘स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँके’च्या संचालक मंडळावर योग्य ती कारवाई करू ! – सहकारमंत्री
नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने कारभार करत कर्जावरील व्याजाचे शुल्क हे १४ टक्क्यांवरून ७ टक्के इतके केले आहेत. त्यामुळे बँकेचा (अधिकोषाचा) ‘क्रेडिट डिपॉझिट रेशो’ खराब झाला आहे, अशी तक्रार रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. या अधिकोषामध्ये झालेल्या अनियमिततेच्या अन्वेषणाचे आदेश दिलेले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेमध्ये दिली. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कर्जावरील व्याज शुल्क अल्प केल्याने भीतीपोटी ठेवीदारांनी १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या आहेत; परंतु या अधिकोषाची आर्थिक स्थिती चांगली आहे. ठेवीदारांनी काळजी करू नये. राज्यशासन योग्य ती काळजी घेत आहे. अधिकोषासंबंधी आलेल्या सर्व तक्रारींची शासनाकडून विभागीय सहनिबंधक यांच्याकडून आवश्यक ती कार्यवाही चालू आहे.