‘अटक वॉरंट’ पाठवून अतिरेकी पकडले जातील का ? – आमदार महेश लांडगे, भाजप
नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – मुसलमानांसाठी नवीन कायदा करायचा का ? ‘आधी नोटीस द्या, मग त्यांना पकडायला जा आणि मग त्यांची चौकशी करा’, असे अतिरेकी पकडले जातील का ? असा प्रश्न भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांनी उपस्थित केला. आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी भिवंडी येथे धाड घालून आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या काही मुसलमानांना अटक केली. ‘अटक वॉरंट’ न देता ही कारवाई झाल्याची ओरड आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली. भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांनी सभागृहात याला विरोध केला. या मागची भूमिका श्री. महेश लांडगे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘आम्ही आतंकवादाला विरोध करतो’, असे एकीकडे बोलायचे आणि दुसरीकडे आतंकवाद्यांना पकडले की, म्हणायचे ‘त्यांना आधी नोटीस द्या, वॉरंट काढा.’ कोणतेही अतिरेकी तुमची वाट बघत बसले आहेत का ? ही मागणीच मुळात चुकीची आहे. अबू आझमी ही व्यक्तीच जातीचे राजकारण करणारी आहे. राष्ट्राचा विषय येतो, तेव्हा सभागृहात आपण एकत्रितपणे लढले पाहिजे. अबू आझमी यांचे वक्तव्य आतंकवादाला खतपाणी घालणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असो किंवा औरंगजेबाचे उद्दात्तीकरण असो त्यांनी नेहमीच आतंकवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे. मुळात या महाराष्ट्रामध्ये सभागृहात त्यांनी आतंकवाद्यांचा विषय घेऊ नये. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली, तर त्याविषयी माहिती उघड करण्यात येईलच.’’