चिंचवड (पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा !
नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर (चिंचवड) येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांद्वारे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर नगरविकास विभागाकडे हे प्राणीसंग्रहालय वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची घोषणाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
आमदार अश्विनी जगताप यांनी याविषयीचा तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘या प्राणीसंग्रहालयाचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण यांसाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा संमत केला आहे. या कामासाठी वर्ष २०१७ पासून प्राणीसंग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने अद्याप हे प्राणीसंग्रहालय सर्वांसाठी उघडण्यात आलेले नाही. प्राण्यांचा मृत्यू हा वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत झाला आहे. या प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे औंध येथील शासकीय रुग्णालयाद्वारे करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून समोर आले आहे.’’ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार योगेश सागर, नाना पटोले हेही या चर्चेत सहभागी झाले होते.