बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘वास्तविक शाश्वत सुखप्राप्तीसाठी विशेष काही करावयास नको. फक्त देवाप्रीत्यर्थ जे काही करतो, ते निष्कामपणे घडले, म्हणजे झाले ! याचा अर्थ असा की, ‘फळाशा न धरता कर्म करणे आणि केलेली कर्मे विसरून जाणे’, या मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने जाऊन मनुष्य देवाची कृपा संपादन करू शकत नाही.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘परमेश्वर’, सुवचन क्र. १३)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. देवासाठी निष्काम कर्म केल्याने माणसाला सुख आणि दुःख यांच्या पलीकडे जाता येऊन शाश्वत सुख प्राप्त होते ! : ‘निष्काम कर्मयोग’, हा भगवद्गीतेतसुद्धा श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. ‘कसलीही आसक्ती न ठेवता आणि फळाची अपेक्षा न धरता आपण कर्म करत रहातो’, त्याला ‘निष्काम कर्म’, असे म्हणतात. ‘निष्काम कर्म’ केल्याने माणूस सुख आणि दुःख यांच्या पलीकडे जातो; कारण तो फळाची आशाच धरत नसतो. ‘यापासून मला काही लाभ होईल, मला काही पैसे मिळतील, मला कुणाचे प्रेम मिळेल’ इत्यादी गोष्टी तो विचारात घेत नाही. त्यामुळे तो आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करत रहातो आणि त्या कर्मफळापासून नेहमी मुक्त रहातो. प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘निष्काम कर्म करत रहाणे आणि तेही देवासाठी करत रहाणे’, यातूनच खरे शाश्वत सुख प्राप्त होते.’
२ आ. शाश्वत सुख, म्हणजे आत्म्याचे सुख ! : शाश्वत याचा अर्थ टिकणारे. ज्या सुखाचा कधी नाश होत नाही, जे सुख कायमस्वरूपी आपल्या मनात आणि देहात वास करते, त्या सुखाला ‘शाश्वत सुख’, असे म्हटले पाहिजे. खरेतर सुख आणि दुःख या मनाच्या दोन अवस्था आहेत; परंतु माणसाला या अवस्था कर्माच्या आसक्तीतून प्राप्त होत असतात. प.पू. कलावतीआई म्हणतात, त्याप्रमाणे खरे शाश्वत सुख म्हणजे आत्म्याचे सुख, आत्मस्वरूपाची जाणीव ! ज्याला आत्मस्वरूपाची जाणीव होते, तो नेहमी दुसर्याची सेवा करत रहातो, दुसर्याला दुखावत नाही आणि दुसर्याचे अहित चिंतत नाही.
२ इ. मोहातून लोभ आणि लोभातून आसक्ती निर्माण होते अन् आसक्ती माणसाला अध्यात्माच्या मार्गावरून भ्रष्ट करून टाकते ! : आपल्याला विविध विषयांचा मोह होतो आणि मग त्याचे रूपांतर लोभात होते. ‘चव, स्पर्श, गंध, स्वर आणि दृष्टी’, यांतून आपल्या मेंदूतील इंद्रियांना जाणीव होते. त्या जाणिवेचे रूपांतर मोहात होते. एखाद्या गोष्टीचा मोह झाला की, ती आपल्याला मिळावीशी वाटते. याला ‘लोभ’, असे म्हणतात. लोभातून आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती माणसाला अध्यात्माच्या मार्गावरून भ्रष्ट करून टाकते.
समोर पक्वान्ने आली आणि त्यातूनही आपल्या आवडीचे पक्वान्न असले की, माणसाला ‘किती खाऊ आणि किती नाही !’, असे होऊन जाते. त्याचप्रमाणे विविध सोयी-सुविधांची साधने बघितली की, ‘ती आपल्या घरी असावीत’, असे माणसाला वाटू लागते आणि हे सर्व मिळवण्यासाठी तो जिवाचा आटापिटा करू लागतो. या सर्व सोयी-सुविधा खरेदी करण्यासाठी पैसा लागतो. माणूस ‘आपल्याला किती पैसा मिळतो आणि आपली उडी कुठपर्यंत जाऊ शकते ?’, हे न बघता त्या सुख-सुविधांच्या मोहात पडतो.
या सुख-सुविधा माणसाच्या ऐहिक, म्हणजे शारीरिक गरजा भागवण्यासाठी निर्माण झालेल्या असतात. यांतून माणसाला थोडेफार मानसिक सुख मिळते; पण ते शाश्वत नसते. ते तेवढ्यापुरते असते, उदा. दूरचित्रवाणी संचाचे (‘टीव्ही’चे) एक ‘मॉडेल’ काही वर्षे बघून झाले आणि नवीन ‘मॉडेल’ बाजारात आले की, आपल्याला ते खरेदी करावेसे वाटते. याचे कारण देतांना आपण म्हणतो, ‘‘आपल्यालाही बदलत्या काळाबरोबर राहिले पाहिजे.’’ माणसाच्या गरजा वाढत्या वयानुसार वाढत जातात. त्याचा संसारही वाढत जातो. त्यामुळे तो या दुष्टचक्रात पूर्ण अडकून जातो. तो भ्रमित होतो आणि पुढे दिलेल्या गाण्याप्रमाणे त्याची अवस्था होते.
विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला ।
अनय-अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला ।
लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला ।
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला ।।
२ ई. सद्गुरूंची आवश्यकता ! : माणसाचे शरीर उपभोग घेऊन घेऊन थकून जाते. दिवसातले १२ – १२ तास कष्ट करून तो पैसा मिळवतो. यातून त्याला शारीरिक सुख भरपूर मिळते; पण तो मानसिक शांती मात्र गमावतो. नंतर तो वेड्यासारखा शांती मिळवण्यासाठी तथाकथित साधू-संतांच्या दारोदारी भटकू लागतो. तिथेही तो फसला जातो. ‘यातून बाहेर कसे यावे ?’, हे सांगण्यासाठी त्याला सद्गुरूंची आवश्यकता भासते; परंतु त्याच्या नशिबात जर सद्गुरु असले, तरच ते त्याला प्राप्त होतात; अन्यथा तो सद्गुरूंच्या शोधात जन्मभर भटकत रहातो आणि शेवटी जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो.
एका मराठी भक्तीगीतात म्हटले आहे,
भूक भाकरीची छाया झोपडीची ।
निवार्यास घ्यावी ऊब गोधडीची ।
माया-मोह सारे उगाळून प्यालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।।
यासाठी ‘देवाप्रती निष्काम कर्म करणे’, हा देवाची कृपा संपादन करण्याचा एकमेव मार्ग आहे’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात.’
– पू. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२६.८.२०२३)