धर्मप्रचाराचे कार्य तळमळीने करतांना आणि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला येतांना बाराहळी (नांदेड) येथील श्री. अरुण सीताराम महाजन यांना आलेल्या अनुभूती
१. राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याचा केलेला प्रयत्न अन् जाणवलेली सूत्रे !
‘वर्ष २०१५ मध्ये गोवा येथे झालेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला मी गेलो होतो. नंतर मी माझ्या गावाच्या शेजारच्या लहान लहान गावांत धर्मसभा घेण्याचा प्रयत्न केला; पण मला सर्व ठिकाणी धर्मसभा घेणे जमले नाही. त्याची माझ्या मनात खंत होती. धर्मकार्य करण्याच्या तळमळीमुळे मी माझ्या शेजारच्या २० गावांत ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ च्या २ सहस्र नामपट्ट्या गावातील मंदिरे आणि घरे यांच्या दारावर लावायचे ठरवले. आरंभी मला वाटायचे, ‘ज्या ज्या गावात साधक आणि धर्मप्रेमी नामपट्ट्या लावायला जातील, तिथे त्या त्या गावातील ४ – ५ लोक तरी जमतील कि नाही ?’; परंतु गुरुकृपेने त्या त्या गावातील ४० – ५० हिंदु धर्मप्रेमी लगेच एकत्र यायचे आणि तेच अर्ध्या ते एक घंट्यात सगळीकडे नामपट्ट्या लावून श्रीरामाचा जयघोष करायचे. त्या त्या गावातील धर्मप्रेमीच हे कार्य करत होते. धर्मप्रेमींमध्ये एवढा उत्साह होता की, अजून ५ सहस्र नामपट्ट्यांची मागणी आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर जिज्ञासूच्या प्रश्नाचे उत्तर देता येणे
एका जिज्ञासूने मला विचारले, ‘‘तुम्ही गावात सर्वत्र रामाच्या नामपट्ट्या का लावत आहात ?’’ मी गुरुदेवांना मनात प्रार्थना करून विचारले, ‘देवा, काय उत्तर देऊ ?’ लगेचच देवाने मनात विचार दिला, ‘हिंदु राष्ट्र आणि रामराज्य लवकर यावे अन् या कार्यासाठी सर्वांना बळ मिळावे; म्हणून रामाच्या नामपट्ट्या लावत आहोत.’
३. ग्रामीण भागात केलेला अध्यात्मप्रचार !
३ अ. अध्यात्मप्रचार करतांना पुष्कळ चैतन्य आणि आनंद मिळणे : ग्रामीण भागात शिवनाम, हरिनाम सप्ताह आणि पारायणे वरचेवर चालू असतात. तिथे जाऊन आम्ही गावकर्यांना कुलदेवी आणि दत्त हे नामजप करायला, तसेच हिंदु धर्मानुसार कपाळावर कुंकू लावायला सांगत होतो. त्याचा सर्वांवर चांगला परिणाम झाला. आता ‘या सर्व २० गावांत ‘नामसत्संग’ घेणे, ‘फ्लेक्स’ लावून धर्मकार्याची माहिती देणे’, असे कार्य सातत्याने चालूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. हे धर्मकार्य करतांना मला आणि धर्मप्रेमींना पुष्कळ चैतन्य अन् आनंद मिळत आहे.
३ आ. ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग घेणे : कोरोना महामारीच्या काळात सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रातून ‘कोरोना प्रतिबंधक नामजपाची ‘ऑनलाईन लिंक’ येत होती. गावांतील लोकांवर त्याचा पुष्कळ चांगला परिणाम झाला. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर सोलापूर सेवाकेंद्राकडून ‘नामजपाची लिंक’ येणे बंद झाले; म्हणून आम्ही ‘नामसत्संग’ नावाच्या ‘टेलिग्राम ॲप’वर गावांतील सर्व जिज्ञासूंना जोडले. साधारण ३० कुटुंबांनी मिळून रात्री ८.३० ते ९ या वेळेत ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप ‘ऑनलाईन’ करायला आरंभ केला. कुटुंबातील सर्व जण एकत्र बसून हा नामजप करतात. हळूहळू ही कुटुंबसंख्या वाढवून १०० कुटुंबांपर्यंत नेण्याचा माझा निर्धार आहे.
४. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी येतांना आलेली अनुभूती
१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी, फोंडा (गोवा) येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होणार होता. त्या महोत्सवाला येण्यासाठी मी माझे नाव नोंदवले होते.
४ अ. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला येण्यापूर्वी आई रुग्णाईत होणे; पण तिनेच जाण्यासाठी प्रोत्साहन देणे : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला जायला निघण्यापूर्वी १५ दिवस माझ्या आईची (श्रीमती पार्वती महाजन यांची) प्रकृती ठीक नव्हती. आईचे वय ९० वर्षे असल्यामुळे ‘जायला जमेल कि नाही ?’, असे मला वाटत होते; पण मला गुरुभेटीची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीची) पुष्कळ तळमळ लागली होती. मला काही सुचत नव्हते; पण अधिवेशनाच्या (‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या) ५ – ६ दिवस आधी माझी आई मला म्हणाली, ‘‘तुला गोव्याला अधिवेशनासाठी जायचे असेल, तर जा. मला काहीही होणार नाही. ते राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य आहे. शरिरात बळ असेपर्यंत तू हे कार्य सोडू नकोस.’’
४ आ. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी गोव्याला आल्यावर आईची प्रकृती सुधारणे : आईचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. लगेच मी नांदेड ते गोवा ‘ट्रॅव्हल बसचे’ आरक्षण केले आणि अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १५ जूनलाच रामनाथीला पोचलो. मी गोव्याला आल्यापासून आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे ‘हे गुरुकृपेमुळेच झाले’, अशी मला अनुभूती आली.’
गुरुसेवक,
– श्री. अरुण सीताराम महाजन, बाराहाळी, ता. मुखेड, जिल्हा नांदेड.(२५.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |