काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना राजसंन्यास घेण्यास भाग पाडून कायमचे घरी बसवा !

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केल्याचे प्रकरण !

कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केले आहे. सावरकर यांच्याविषयी स्वतःचे मत मांडतांना ते म्हणाले, ‘‘सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी कुणी दिली ? त्यांचे असे काय कर्तृत्व आहे ? ब्रिटिशांची ‘पेन्शन’ (निवृत्तीवेतन) घेणारे आणि त्यांना शरण जाणारे सावरकर आहेत. अशा माणसाचे छायाचित्र विधानसभेतून काढून टाकले पाहिजे.’’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशा प्रकारचे आक्षेप वारंवार घेतले जातात. या आक्षेपांचे वा आरोपांचे सप्रमाण खंडण अनेक वेळा करण्यात आले आहे. तरीसुद्धा सावरकर यांच्यावर आगपाखड वारंवार केली जाते. या मागची मानसिकता विकृत आहे, हे सांगण्यासाठी कुणा तज्ञ माणसाची आवश्यकता नाही.

१. सावरकर नसते, तर काँग्रेसने भारतात इस्लामिक सत्ता सहज प्रस्थापित केली असती !

प्रियांक खर्गे आज स्वतंत्र हिंदुस्थानातील कर्नाटक राज्याचे मंत्रीपद सांभाळत आहेत, ते सावरकर यांनी केलेल्या त्यागाचे फळ आहे. ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही. ‘सावरकर यांनी राष्ट्रासाठी काय केले ?’, हा प्रश्न जेव्हा त्यांच्या मुखातून येतो, त्या वेळी त्यांना स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास ठाऊक नाही, हेच सिद्ध होते.

सावरकर यांनी या हिंदुस्थानचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होण्यापासून रक्षण केले आहे. सावरकर नसते, तर आज या देशात इस्लामिक सत्ता सहजतेने प्रस्थापित करणे, हे काँग्रेसला शक्य झाले असते. मुळातच देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले, ते सावरकर यांच्या युद्धनीतीमुळे ! गांधींच्या अहिंसेमुळे हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही. हे सत्य सांगण्यासाठी काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला नाही. दुसर्‍याच्या कष्टावर, म्हणजेच सावरकर यांच्या कष्टावर काँग्रेसने स्वतःच्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. मुसलमानांची दादागिरी मोडून काढण्यासाठी सावरकर यांनी केलेला प्रयत्न !

‘देश स्वतंत्र झाल्यावर होणार्‍या निवडणुकीत स्वतःचा पराभव होणार’, याची खात्री काँग्रेसला होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संपूर्ण देशात राष्ट्रीय भावना जागृत केली होती. गांधींनी स्वातंत्र्यापेक्षा हिंदु – मुसलमान ऐक्याला प्राधान्य दिले. परिणामी मुसलमानांची दादागिरी या देशात वाढत चालली होती. सावरकर यांच्यामुळे या गोष्टीला पायबंद घातला गेला. ब्रिटिशांच्या सैन्यात असलेले मुसलमानांचे संख्याबळ न्यून करून हिंदूंचे संख्याबळ वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम सावरकर यांनी केले.

३. सावरकर यांनी स्वातंत्र्यलढ्याचा यज्ञकुंड धगधगता ठेवण्यासाठी केलेली सशस्त्र क्रांती !

 

 

स्वातंत्र्यवीर सावरकर

हातात शस्त्र घेऊन हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदूंचे राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या ब्रिटिशांसमोर नि:शस्त्र लढा देऊन स्वातंत्र्य निर्माण करता येणार नाही, हे सावरकर जाणत होते. आपल्या देशाची परंपरा एक क्षात्रतेजाने भरलेली आहे. ही शौर्याची परंपरा आणि त्याचा वारसा अबाधित ठेवण्यासाठी सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीने परकीय राजसत्तेपासून राष्ट्राची मुक्तता करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याचा यज्ञकुंड धगधगता ठेवला. तो असा…

३ अ. सावरकर यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांची संख्या वाढणे : सावरकर यांनी केवळ हिंदुस्थानातील हिंदी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामागे जसे देश स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे मूलभूत कारण होते, तेवढेच महत्त्वाचे आणखी एक कारण, म्हणजे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदी तरुणांची संख्या अत्यंत अल्प होती. त्यांची संख्या सैन्यात अधिक असणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या संरक्षणाचे दायित्व राष्ट्रनिष्ठ असलेल्या सैनिकांच्या खांद्यावर देणे क्रमप्राप्त होते. सावरकर यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

३ आ. हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून सावरकर यांची भेट घेण्याविषयी बॅरिस्टर जीना यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सांगणे : सावरकर यांना आणखी एक गोष्ट साध्य करायची होती. त्यासाठी सावरकर आणि सुभाषबाबू यांची अचानक झालेली भेट ही त्यांचा मनोदय पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरली. २२ जून १९४० या दिवशी त्या वेळचे देशगौरव आणि नंतरचे नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर यांना भेटण्यासाठी अचानकपणे सावरकर सदनात आले. ते सावरकर यांना म्हणाले, ‘‘मी आताच बॅरिस्टर जीनांना भेटून आलो; पण त्यांनी मला विचारले, ‘मिस्टर सुभाषबाबू तुम्ही कुणाच्या वतीने तडजोडीची बोलणी करण्यास आला आहात ?’’ सुभाषबाबू जीनांना म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या वतीने.’’ जीना म्हणाले, ‘‘पण तुम्हाला तर काँग्रेसने बहिष्कारले आहे.’’ सुभाषबाबू म्हणाले, ‘‘मी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाचा अधिकृत पुढारी आहे. त्याच्या वतीने मी बोलू शकतो.’’ जीना म्हणाले, ‘‘जर तुम्ही मला मुसलमानांचा पुढारी म्हणून हिंदु-मुसलमानांच्या तडजोडी करता भेटत असाल, तर हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार असलेल्या कुणाशी तरी बोलण्यात अर्थ आहे. तुमचा पक्ष स्वतःला हिंदु संस्था म्हणवून घेतो आहे का ?’’ जीनांच्या या प्रश्नावर सुभाषबाबू म्हणाले, ‘‘मी एक हिंदू म्हणून तरी हिंदु-मुसलमान तडजोडीविषयी बोलू इच्छितो.’’ यावर जीना म्हणाले, ‘‘तुम्ही प्रथम सावरकरांना जाऊन भेटा. हिंदूंचे प्रतिनिधित्व तेच करू शकतात. व्यक्तीने व्यक्तीशी चर्चा करण्यात काही उपयोग नाही. सावरकर आले, तर आपण काही चर्चा करू.’’ जीनांच्या या उत्तरामुळे सुभाषबाबू सावरकर यांना भेटायला सावरकर सदनात गेले.

३ इ. सावरकर यांनी सुभाषबाबूंना हिंदी सैन्याचे नेतृत्व करण्याविषयी सांगणे : सावरकर यांनी सुभाषबाबूंना मुख्य मुद्याकडे वळण्यासाठी विचारले, ‘‘हे सर्व सोडून द्या. यावर चर्चा करण्यापेक्षा आपण अधिक महत्त्वाच्या मुद्यावर संवाद साधणे महत्त्वाचे आहे. सध्या महायुद्धाच्या संकटात ब्रिटन सापडला आहे. आपल्यासारखा पुढारी हिंदुस्थानात राहून हालवेलचा पुतळा कलकत्त्याच्या मार्गातून उखडून टाकण्यासाठी चळवळीत गुंतला आहे. अशा अत्यंत क्षुल्लक चळवळीमुळे ब्रिटिशांच्या कारागृहात जाऊन सडत पडण्यात काहीही अर्थ नाही.’’ सुभाषबाबू म्हणाले, ‘‘सावरकर, जनतेत काहीही करून ब्रिटिशांच्या विरोधात संताप निर्माण केला पाहिजे. तेच काम मी करत नाही का ?’’ सावरकर यांनी त्यांचे प्रामाणिक राष्ट्रकार्य आणि तळमळ यांचे कौतुक केले. मग त्यांनी जपानमध्ये वास्तव्य करत असलेल्या रासबिहारी बोस यांच्याशी चालू असलेल्या पत्रव्यवहाराविषयी सांगितले. पुढे सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले, ‘‘आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, या न्यायाने ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यातील काही सैनिक जर्मनीच्या हाती सापडले आहेत. त्या सैनिकातून क्रांतीसैन्य उभे करण्यात आले आहे. जर्मनी आणि जपान यांच्या अद्ययावत् शस्त्रानिशी अन् लढाईत मुरलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांची हिंदुस्थानवर बाहेरून स्वारी करण्याची कधीही न आलेली सुवर्णसंधी आपण आता साधू शकतो. अशा वेळी तुमच्यासारख्या पुढार्‍याने हिंदुस्थानात रहाणे उचित नाही. रासबिहारींसारखे तुम्ही सुद्धा ब्रिटीश सरकारच्या हातावर तुरी देऊन या देशातून बाहेर पडा. सहस्रावधी हिंदी सैनिकांचे नेतृत्व तुम्ही करावे. ’’

३ ई. सुभाषबाबूंनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जर्मनीला जाणे आणि पुढे हिंदी सैन्याचे ‘सरसेनापती’ पद स्वीकारणे : हे सर्व बोलणे ऐकून झाल्यावर सुभाषबाबू सावरकर यांना म्हणाले, ‘‘मी प्रथम कलकत्त्याला जाऊन तिथे काय घडते, ते पहातो. इकडे आल्यास पुन्हा आपल्याला भेटेन.’’ यानंतर ते निघून गेले. सुभाषबाबू कलकत्त्याला गेल्यावर ते तेथील हालवेलचा पुतळा उखडून टाकण्याच्या कामात व्यस्त झाले. पुढे ब्रिटीश सरकारने त्यांना पकडून कारागृहात टाकले. त्यानंतर ते ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जर्मनीला गेले. नंतर ते पाणबुडीने जपानने जिंकलेल्या सिंगापूरला गेले. सिंगापूरहून ब्रिटीश सेनानी पळून गेल्याने तिथे उरलेल्या शस्त्रास्त्रांच्या अपार साठ्याने तेथील ४० ते ५० सहस्र हिंदी सैन्याने जपानच्या पाठिंब्यामुळे रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी क्रांतीसैन्य उभारले. सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे सुभाषबाबूंनी याच सैन्याचे ‘सरसेनापती’ पद स्वीकारले. पुढे ती क्रांतीसेना सिंगापूरहून ‘चलो दिल्ली’ची रणगर्जना करत ब्रह्मदेश ओलांडून थेट आसामच्या दाराशी येऊन धडकली. यापुढे हिंदी सैन्य ब्रिटीश सैन्याशी कसे लढले, याचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.

४. सावरकर यांच्या सैनिकीकरणाच्या चळवळीमुळेच हिंदी सैनिक मिळणे !

सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे सावरकर यांनी चालू केलेली सैनिकीकरणाची चळवळ कशी लाभदायक ठरली ? याकडे मला सर्वांचे लक्ष वेधायचे आहे. सावरकर यांच्या सैनिकीकरणामुळे स्वतंत्र सेनेला सैनिक मिळाले, हे त्यांच्या राजनीतीचे वैशिष्ट्यपूर्ण यश होते. हिंदुस्थानच्या ब्रिटीश सैन्यात सहस्रावधी हिंदु सैनिकांची भरती करण्यासाठी सावरकर यांनी जे सैनिकीकरणाचे आंदोलन केले, त्यामुळे हे शक्य झाल्याचे आपल्याला विसरून चालणार नाही. याचविषयी सिंगापूरमधील ‘आझाद हिंद आकाशवाणी’वरून २५ जून १९४४ या दिवशी सरसेनापती सुभाषबाबू त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘‘काँग्रेसमधील बहुतेक अदूरदर्शी पुढारी ब्रिटीश हिंदी सैन्याला केवळ भाडोत्री आणि पोटभरू म्हणून सारखे हिणवत राहिले. तरीही उत्साहदायी गोष्ट ही आहे की, वीर सावरकर निर्भयपणे हिंदी तरुणांना ‘सशस्त्र सैन्यात भरती व्हा’, म्हणून सारखे उत्तेजित करत आहेत. ब्रिटीश सैन्यातील याच हिंदी तरुणांनी आज आमच्या हिंदी राष्ट्रीय सैन्याला युद्धकलेत प्रवीण असलेल्या सैनिकांचा पुरवठा होत आहे.’’

५. सावरकर यांच्या सैनिकीकरणाच्या चळवळीविषयी जपानमधील सुप्रसिद्ध ग्रंथकाराने केलेले वर्णन !

ऑगस्ट १९५४ मध्ये जे.सी. ओहसावा या जपानमधील सुप्रसिद्ध ग्रंथकाराचे ‘द टू ग्रेट इंडियन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात रासबिहारी बोस यांचे चारित्र्य आणि त्यांचे जपानमधील वास्तव्य यांविषयी त्यांनी केलेल्या क्रांतीकारक कार्याचा अभूतपूर्व वृत्तांत दिला आहे. या ग्रंथकारांनी रासबिहारी बोसांच्या क्रांतीकारक सैन्याची तुकडी ब्रिटिशांशी लढत असल्याच्या प्रसंगासंबंधीचा एक उतारा इथे सांगणे सयुक्तिक ठरेल.

‘फेब्रुवारी मासात जपानने सिंगापूरवर आक्रमण केले. ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांचा अडथळा जबरदस्त होता. जपानमधील सैन्याला अनेक अडथळे दूर करण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागला. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सेनेचे प्रमुख आघाडीवर होते. ब्रिटीश सैनिकांना हिंदुस्थानातील हिंदी सैनिकांविषयी कोणत्याही प्रकारे आपुलकीची भावना नव्हती. त्याचबरोबर त्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी आत्मीयता नव्हती. ही गोष्ट हिंदी सैनिकांना विशेषत्वाने जाणवली. त्याच क्षणी हिंदी सैनिकांनी सावरकर यांनी सांगितलेला मंत्र तात्काळ उपयोगात आणला. त्यांनी आपल्या हातातील शस्त्र ब्रिटीश सैनिकांवर चालवली. अशा प्रकारे सावरकर यांच्या सैनिकीकरणाची चळवळ दुसर्‍या महायुद्धात आकाराला आली. ब्रिटीश सैन्यात सहभागी झालेले हिंदी आणि क्रांतीसेना यांतील सैनिक यांनी एकत्रितपणे जेव्हा विजयाच्या घोषणा दिल्या, त्या वेळी जपानी सैनिकांची मती गुंग झाली.’’ अशा प्रकारे जपानी सैन्याने सिंगापूर कह्यात घेऊन स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले.

६. सैनिकीकरणाच्या नीतीमुळेच ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडून जावे लागणे 

सावरकर यांची रणनीती यशस्वी झाली होती; म्हणूनच ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील स्वतःचा गाशा गुंडाळण्याचे ठरवले. ‘भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी’च्या कायद्याच्या वेळी ब्रिटीश संसदेमध्ये सत्ता सोडण्याचा प्रसंग आल्यामुळे चर्चिलच्या अनेक प्रश्नांना निरुपायाने उत्तर द्यावे लागले. ब्रिटीश पंतप्रधान ॲटलींनी स्वतःच्या सरकारच्या मनाच्या सत्यस्वरूपाचे मोजक्या वाक्यात वर्णन करतांना म्हटले, ‘‘ब्रिटनला सत्तांतर करावे लागत आहे; कारण भारतीय सैन्य ब्रिटीश सरकारशी प्रामाणिक राहिले नाही. भारतावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सैन्य ब्रिटीश सरकार भारतात ठेवू शकत नाही.’’ यातून हेच स्पष्ट होते की, सैनिकी दुर्बलतेच्या कारणामुळे ब्रिटिशांना हिंदुस्थानातून काढता पाय घ्यावा लागला.

‘आम्हाला अहिंसेचे तत्त्वज्ञान पटल्यामुळे आमचे हृदय परिवर्तन झाले किंवा साम्राज्यवाद हा अन्यायकारक आहे, ही गोष्ट आम्ही स्वेच्छने स्वीकारली. त्यामुळे आम्ही हिंदुस्थान सोडून जात आहोत’, असे ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली म्हणाले नाहीत किंवा ब्रिटिशांच्या संसदेतील कोणताही सभासद असे म्हणाला नाही. ही गोष्ट आपण दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळे सावरकर यांच्या सैनिकीकरणाच्या मागची राजनीती त्यांच्या विरोधकांना एक तर कळली नसावी किंवा स्वतःची हार त्यांना मान्य नसावी; म्हणूनच त्यांनी त्यांच्या सैनिकीकरणाला विरोध करून ‘रिक्रुटवीर’ (भरतीवीर) म्हणून सावरकर यांची हेटाळणी केली.

७. सावरकर यांच्यासारख्या देशभक्ताला अवमानित करणे म्हणजे देशद्रोहच !

सावरकर यांनी दिलेला हा लढा आणि त्यांची राजनीती यांमुळेच प्रियांक खर्गे आज कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री म्हणून गावभर फिरत आहेत. सावरकर यांच्या या कार्याकडे पाठ फिरवून ‘सावरकरांनी देशासाठी काय केले ?’, असा प्रश्न विचारून त्यांचे तैलचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याचा उद्धटपणा प्रियांक खर्गे यांनी केला आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास ज्याला ठाऊक नाही, अशा माणसाला कोणतेही राजकीय पद उपभोगण्याचा नैतिक अधिकार नाही. सावरकर यांच्यासारख्या देशभक्ताला अवमानित करण्याचा अक्षम्य अपराध प्रियांक खर्गे यांनी केला आहे. हा अपराध देशद्रोही अपराधाएवढाच भयंकर आहे. जनतेने प्रियांक खर्गे यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देऊन राजसंन्यास घेण्यास भाग पाडावे आणि त्यांना कायमचे घरी बसवावे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (९.१२.२०२३)