सर्पदंश झालेल्या व्यक्तींना हानीभरपाई देण्याचे निर्देश ! – प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकारी
नारायणगाव – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक साहाय्य देण्याची मागणी केली होती. केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी तातडीने लक्ष घालून सर्पदंशापासून स्थानिक ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्याचे आणि सर्पदंश झालेल्या ग्रामस्थांना हानीभरपाई देण्याचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस्.जी. टेंभुर्णीकर यांना पत्राद्वारे दिले आहेत. जुन्नर तालुक्यातील घोणस सर्पदंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय वनविभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांची भेट घेतली.
या वेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक साहाय्य देण्याची आणि यासंदर्भात उपाययोजना करावी, हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला कार्यवाही करण्यास भाग पाडावे, सरकारनेही सर्पदंशामुळे मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देण्याविषयी तसेच वैद्यकीय उपचार विनामूल्य मिळावेत यासाठी पावले उचलावीत, जुन्नर तालुक्यात ‘स्नेक बाईट’ केंद्र चालू करावे.