परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाचा पहिला भाग आपण ११ डिसेंबर २०२३ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा ११ डिसेंबरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/744824.html
५. साधकांना आनंदात ठेवले की, ‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच आनंद देत आहोत’, असा साधकाचा भाव असणे
श्री. राजेश दोंतुल : ‘आता मला पुष्कळदा वाटते, ‘मी साधकांना कसे आणि काय सांगून आनंद देऊ ?’ त्यांना त्रास होतांना पाहिले, तर मला ते सहन होत नाही. त्यांना आनंदात ठेवले, तर ‘मी आपल्यालाच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच) आनंद देत आहे’, असा भाव मी ठेवतो.
६. ‘सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीच्या कृतज्ञताभावात राहिल्यास मनात नकारात्मक विचार येत नाहीत’, असे साधकाने सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : साधकांना नामजप, साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला सांगतोस ना ?
श्री. राजेश दोंतुल : हो गुरुदेव. आता मी आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन साधकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. पुष्कळ साधक ‘मनात हा विचार आहे, तो विचार आहे’, याचाच ध्यास ठेवतात. त्याऐवजी ‘माझ्या गुरुदेवांनी मला एवढे उपाय दिले आहेत’, याची जाणीव ठेवून त्यांनी मनाला सेवेत गुंतवावे. सेवा करतांना असाच विचार ठेवला, तर ‘आपण नकारात्मकतेत जात नाही’, असे मला वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ छान !
७. ‘परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये पूर्ण भारत सामावलेला असल्यामुळे त्यांच्यासाठी काही केले की, ते भारतासाठीच केल्यासारखे होते’, असा साधकाचा भाव असणे
श्री. राजेश दोंतुल : आपले रक्षण, म्हणजे आपले रक्षण नसून, ते संपूर्ण भारताचेच रक्षण आहे. गुरुदेव, आमच्यासाठी आपल्यामध्येच (गुरुदेवांमध्येच) संपूर्ण भारत सामावलेला आहे. आपणच आमचे सर्वस्व आहात. आम्ही आपल्यासाठी काही केले, तर सर्वकाही तेथे आपोआप होऊन जाते. आम्हाला वेगळे काही करण्याची आवश्यकताच नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : या ठिकाणी भाव महत्त्वाचा आहे.
८. एखादा साधक भावाच्या स्थितीला आल्यावर त्याची व्यष्टी साधना झालेली असल्याने त्याने समष्टी साधना करणे आवश्यक असणे
श्री. राजेश दोंतुल : गुरुदेव, आपण सांगितले होते, ‘माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले होत आहेत, तर आता मी समष्टीचे कार्य करायचे आहे.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजेच जेव्हा एखादा साधक भावाच्या स्थितीला येतो, तेव्हा त्याची व्यष्टी साधना झालेली असते. त्याने समष्टी साधना करणे आवश्यक असते.
श्री. राजेश दोंतुल : व्यष्टी साधना करून समष्टी साधना करणारा एक राजेश होता; परंतु आता दोन राजेश आहेत. त्यांतील एकाचा (म्हणजे राजेशचा) व्यष्टी साधनेचा संस्कार पूर्ण झाला. त्यामुळे तो व्यष्टी साधना सतत करतच रहातो. दुसरा जो राजेश आहे, तो समष्टीचा विचार करतो. एकाच वेळी २ – २ राजेश ! आता व्यष्टी साधनेच्या समवेतच समष्टी साधनाही होते. त्यामुळे आता ‘व्यष्टी साधनेकडे लक्ष द्यावे’, असे वाटतच नाही.
गुरुदेव, आपलीच कृपा आहे. आपल्याच कृपेमुळे मी येथे आहे गुरुदेव. या राजेशचे अस्तित्व, ही आपलीच कृपा आहे. बाकी काही नाही गुरुदेव !
परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ छान !’ (क्रमशः)