पुणे येथील सौ. सुखदा अमोल करंबेळकर यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
‘१६.४.२०२२ या दिवशी आम्ही करंबेळकर कुटुंबीय रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. आमच्या विवाहानंतर ‘आम्हाला परम पूज्यांचे आशीर्वाद लाभावेत’, यासाठी आम्ही आश्रमात आलो होतो. माझे यजमान श्री. अमोल, सासू-सासरे (सौ. अंजली आणि हनुमंत करंबेळकर) हे सनातन संस्थेचे साधक आहेत; पण मला सनातन संस्थेविषयी काहीच ठाऊक नव्हते.
१. रामनाथी आश्रमात सर्वत्र एकसारखाच दैवी सुगंध येणे
१ अ. रामनाथी आश्रमातील दैवी वातावरणामुळे भारावून जाणे आणि पूर्ण आश्रम पहातांना सुगंध येणे : ‘आम्ही रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यावर तेथील दैवी वातावरणाने मी भारावून गेले. आम्हाला आश्रम दाखवण्यासाठी एक साधक आले होते. त्यांनी आम्हाला स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेण्यास सांगून त्या चित्राविषयी माहिती दिली. आम्ही एक एक कक्ष पहात आणि तेथील माहिती घेत असतांना अकस्मात् मला सुगंध आला. मला वाटले, ‘कुठेतरी उदबत्ती लावली असावी किंवा आश्रमात ‘एअर प्युरिफायर’ लावले असावेत.’
१ आ. स्वतः सनातनची साधिका नसतांनाही सुगंधाची अनुभूती येणे : आम्ही पुढील कक्षात गेल्यावर तिथेही मला तोच सुगंध आला. कुतूहल वाटून मी ‘एअर प्युरिफायर’ कुठे लावले आहे का ?’, ते शोधक दृष्टीने पहात होते; परंतु असे यंत्र लावल्याचे मला कुठेही दिसले नाही. मी माझे सासू-सासरे आणि पती श्री. अमोल यांना या सुगंधाविषयी विचारले; पण त्यांना सुगंध येत नव्हता. तेव्हा आम्हाला आश्रम दाखवणार्या दादाने मला सांगितले, ‘‘परमेश्वर त्याचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी असे संकेत देत असतो.’’ माझ्या मनात आले, ‘मी सनातनची साधक नाही. मग मला अशी अनुभूती का येत आहे ?’
१ इ. आश्रमाच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक चालू असतांनाही स्वयंपाकाचा वास न येता तोच सुगंध येणे : नंतर आम्ही आश्रमाच्या स्वयंपाकघरात गेलो. तेथे वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक चालू होता; परंतु मला स्वयंपाकाचा वास आला नाही. एवढ्या मोठ्या स्वयंपाकघरातही मला तोच सुगंध येत होता. पूर्ण आश्रम पहातांना मला सर्वत्र तोच सुगंध सतत येत होता. मला आमच्या विश्रामकक्षातही तोच सुगंध आला.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथमच झालेले अविस्मरणीय दर्शन !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण होणे : मागील २ दिवसांपासून मी माझ्या सासूबाई आणि यजमान यांच्याकडून परम पूज्यांविषयी बरेच काही ऐकले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची माझ्या मनात पुष्कळ उत्कंठा निर्माण झाली होती. आम्हाला परम पूज्यांचा सत्संग लाभणार आहे’, असे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘त्यांचा सत्संग लाभणार’, हे ऐकून माझ्या सासूबाई आणि यजमान यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. हे सर्व माझ्यासाठी फारच नवीन होते.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने सभोवतालची जाणीव न रहाणे आणि त्यांच्या देहावर कमळ, त्रिशूळ आणि ॐ दिसणे : सत्संगात परात्पर गुरुदेवांच्या मुखाकडे एकटक पहातच राहिले. इतके प्रचंड तेज मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्यांच्याकडे पहातांना मला सभोवतालचे भान राहिले नाही. ‘जणू मी तिथे एकटीच आहे’, असे मला वाटले. मला कुणाचेही बोलणे ऐकू येत नव्हते. काही वेळाने मला परात्पर गुरु डॉक्टरांचे मुख गुलाबी दिसू लागले. मला त्यांच्या कपाळावर तीन गुलाबी रंगाच्या कमळाच्या पाकळ्या दिसल्या. काही वेळाने मला त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाच्या जवळील शिरांमध्ये त्रिशूळ आणि ॐ दिसले.
२ इ. यजमानांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावर दिसणारे कमळ पहाण्यास सांगणे; पण त्यांना ते न दिसणे : मी माझे पती श्री. अमोल यांना म्हणाले, ‘‘परम पूज्यांच्या कपाळावर कमळ दिसत आहे, ते पहा’’; पण ते म्हणाले, ‘‘मला असे काही दिसत नाही.’’
‘परम पूज्यांनी मला पहिल्याच सत्संगात अनुभूती दिल्या’, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते !’
– सौ. सुखदा अमोल करंबेळकर, पुणे. (३.७.२०२२)