चीनचा भूतान कह्यात घेण्याचा प्रयत्न !
लंडन – भूतानच्या उत्तर भागात चीन वेगाने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. चीन आणि भूतान यांच्यामधील सीमाविवाद सोडवण्यासाठी चर्चा चालू आहे. भूतान कह्यात घेण्याचा चीन प्रयत्न करत असल्याचे चित्र उपगृहाच्या माध्यमातून समोर आले आहे. लंडन विद्यापिठाचे प्राध्यापक रॉबर्ट बार्नेट म्हणाले की, चीनला उत्तर भूतान कह्यात घ्यायचा आहे. आगामी काळात भूतानचे जाकरलुंग खोरे चीनच्या कह्यात जाऊ शकते.
१.चीन जाकरलुंग खोर्यात जे बांधकाम करत आहे, ते केवळ चौकीचे नाही. चीनला इथे लोकांना स्थायिक करायचे आहे. यातून भूतान कह्यात घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा दिसून येते, असे तज्ञ डेमियन सायमन यांनी म्हटले आहे.
२.चीनने यापूर्वीही भूतानच्या अनेक भागांत रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला होता. वर्ष २०१७ मध्ये चीनने दक्षिण-पश्चिम डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला होता. येथे त्यांची भारतीय सैनिकांशी झटापट झाली होती. वास्तविक डोकलाममध्ये चीन, भारत आणि भूतान या तिन्ही देशांच्या सीमा आहेत.
भारत हा भूतानचा सर्वांत मोठा मित्र
भूतानची भारताशी पहिल्यापासून जवळीक आहे; मात्र भारताने त्याच्या परराष्ट्र धोरणात कधीही हस्तक्षेप केला नाही. ८ लाख लोकसंख्या असलेल्या भूतानने अलिप्त धोरण स्वीकारले आहे.
संपादकीय भूमिकाधूर्त चीन हा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, मालदीव आणि आता भूतान या भारताच्या शेजारील देशांना स्वतःच्या जाळ्यात ओढून भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा धोका वेळीच ओळखून चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे ! |