गोवा : सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक

पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) : सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून कान्सा थिवी येथील एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. नोकरीसाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक असून त्याचे शुल्क म्हणून एका महिलेकडून २० सहस्र रुपये घेण्यात आले. संशयिताने स्वतः सांखळी येथील रवींद्र भवनमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले आणि या महिलेच्या भावाच्या मुलीला मासिक ३ लाख रुपये वेतन असलेली सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर त्या संशयिताने याच महिलेच्या भाचीची सरकारी नोकरीसाठी वैद्यकीय चाचणी करावी लागेल, असे सांगून तिच्याकडून शुल्क म्हणून २० सहस्र रुपये घेतले; परंतु नंतर या संशयिताने सरकारी नोकरी मिळवून दिली नाही. त्याने घेतलेले २० सहस्र रुपयेही परत केले नाहीत. महिलेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने संशयिताच्या विरोधात कोलवाळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

  • गोव्यात सरकारी नोकरी दलालांमार्फत मिळते का ? जनताही अशा प्रकारे आडमार्गाने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न का करते ?
  • या घटनेत महिलेचे अज्ञान आहे कि लाच देऊन दलालांमार्फत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न आहे ?