देवगड (सिंधुदुर्ग) समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
मृतांची एकूण संख्या ५ झाली
देवगड : संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. यांपैकी पायल बनसोडे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे, अंकिता गारटे या ४ मुलींचा मृत्यू झाला होता. यातील अत्यवस्थ असलेल्या आकाश तुपे या मुलाला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते, तर राम डिचोलकर या मुलाचा शोध घेण्यात अपयश आले होते. डिचोलकर याचा मृतदेह १० डिसेंबर या दिवशी येथील समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमी समोर सापडला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.
(सौजन्य : MAZE KOKAN)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून दु:ख व्यक्त
ही घटना समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ‘येथे येणार्या पर्यटकांनी आवश्यक ती सावधानता बाळगावी. पर्यटनासाठी आल्यावर येथे असलेल्या नियमांचे पालन करावे’, असे आवाहन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 9, 2023
‘संकल्प सैनिक अकादमी’चे संचालक नितीन गंगाधर माने यांना अटक आणि सुटका
या घटनेत मृत्यू झालेल्या अंकिता गालटे हिचे वडील राहुल पांडुरंग गालटे यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पुणे येथील ‘संकल्प सैनिक अकादमी’चे संचालक नितीन गंगाधर माने (वय ४० वर्षे) यांच्यावर, ‘सहल आयोजित करणे, तसेच मुलांना समुद्राच्या ठिकाणी ‘लाईफ जॅकेट’ न देता, समुद्राच्या पाण्याची कोणतीही माहिती न देता नेले, असा ठपका ठेवून त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
वाहनचालकावर गुन्हा नोंद
पुणे येथून मुलांना पर्यटनासाठी घेऊन आलेले वाहनचालक सखाराम बापू तांबे (वय ४५ वर्षे, रहाणार पुणे) यांच्यावर देवगड पोलिसांनी, प्रादेशिक परिवहन विभागाची (RTO ची) अनुमती न घेता वाहतूक केल्याचा, तसेच वाहनाचा कर न भरल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.