साधकांनो, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न करतांना प्रतिदिनच प्रगतीची स्वयंसूचना घ्या !
१. अनिष्ट शक्तींनी मुख्यत्वे नकारात्मक विचारांद्वारे त्रास देणे
‘अनिष्ट शक्ती मुख्यत्वे नकारात्मक विचारांद्वारे त्रास देतात. मनात नकारात्मक विचार येत असल्यास व्यक्तीकडून भावपूर्ण नामजप होत नाही. त्यामुळे तिच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ होऊन तिचा देह, मन आणि बुद्धी यांची कार्यक्षमता न्यून होते. अशा प्रकारे अनिष्ट शक्तींना व्यक्तीवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वभावदोष निर्मूलनाच्या प्रक्रियेसंबंधी आढावासेवकांशी बोलून ‘प्रगतीची स्वयंसूचना’ घेण्याचा कालावधी निश्चित करावा.
२. प्रगतीच्या स्वयंसूचनेचे महत्त्व
अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना प्रगतीची स्वयंसूचना प्रतिदिन घेतल्याने मनात नकारात्मक विचार येत नाहीत किंवा मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण पुष्कळ अल्प होते. या संदर्भात आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांशी बोलल्यावर ‘६ पैकी ५ साधक प्रगतीची स्वयंसूचना देत नाहीत आणि त्यांच्या मनात अनेकदा नकारात्मक विचार येतात’, असे मला आढळले.
आ. प्रगतीच्या स्वयंसूचनेच्या संदर्भात एका मानसोपचार तज्ञांनी सांगितले, ‘‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे स्वयंसूचना सत्र एखाद्या दिवशी काही अडचणीमुळे करता आले नाही, तरी प्रगतीच्या स्वयंसूचनेचे सत्र प्रतिदिनच करायला हवे; कारण प्रगतीची सूचना दिल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्यासाठीचा उत्साह टिकून रहाण्यास साहाय्य होते.’’
३. प्रगतीच्या स्वयंसूचनेच्या सर्वसाधारण पद्धती
३ अ. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न नियमित केल्याने माझ्यातील … हा स्वभावदोष ५० टक्के, … हा स्वभावदोष ३० टक्के आणि … हा स्वभावदोष २५ टक्के न्यून झाला आहे अन् माझ्या आनंदामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न नियमित करीन.
३ आ. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न नियमित केल्याने मला पुढील लाभ झाले आहेत.
१. आता मला स्वयंसूचना अल्प वेळेत बनवता येतात.
२. स्वयंसूचना सत्र केल्यावर मनाला उत्साह जाणवतो.
३. एका प्रसंगी चुकीच्या मुळाशी जाऊन स्वभावदोष शोधता आल्यावर माझ्या मनाला हलकेपणा जाणवला.
४. प्रसंग घडतांना मनात विचारांद्वारे उफाळून आलेल्या किंवा कृतीतून व्यक्त झालेल्या स्वभावदोषांची जाणीव होऊन मनाला तीव्र खंत वाटते.
५. माझ्याकडून स्वतःच्या किंवा इतरांच्या प्रसंगांत अडकणे न्यून झाले. त्यामुळे विचारांमध्ये व्यय (खर्च) होणारी मनाची ऊर्जा वाचली.
६. साधकांच्या गुणांचे लगेच त्यांच्या समोर आणि अन्य साधकांकडेही कौतुक केल्यामुळे मला सकारात्मकतेचा आनंद मिळतो.
७. लहान लहान प्रसंगांत देवाची कृपा आणि साधक करत असलेले साहाय्य यांची जाणीव होऊन मनात त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव जागृत होतो.
त्यामुळे मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न नियमित करीन.
३ इ. प्रगतीची स्वयंसूचना पुढील विषयांच्या आधारेही बनवू शकतो.
१. संत, सद्गुरु, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक
२. चांगली अनुभूती इत्यादी.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |