नामजप करतांना साधिकेला ‘शिवपिंडीवर अर्धनारीश्वर महादेवच अभिषेक करत आहे’, असे दृश्य दिसणे आणि तिने त्या दृश्याचे चित्र काढणे
१. नामजप करतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
‘सप्टेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मी नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून एक शिवपिंडी दिसली. त्या शिवपिंडीवर अर्धनारीश्वराचे (अर्धे महादेवाचे आणि अर्धे पार्वतीचे) मुख होते. त्या शिवपिंडीवर अर्धनारीश्वराच्या रूपातील साक्षात् महादेवच अभिषेक करत होता. आजपर्यंत मी असे दृश्य किंवा या दृश्याचे चित्र कुठेही पाहिले नव्हते. त्या वेळी देवाने माझ्या मनात विचार दिला, ‘मी तुला हे चित्र काढण्याची प्रेरणा योग्य वेळी देईन.’ त्यानंतर मी त्या दृश्याविषयी विसरून गेले.
२. काही दिवसांनी वरील दृश्य पुन्हा डोळ्यांसमोर दिसणे आणि देवाच्या कृपेने त्याचे चित्र २० ते २५ मिनिटांत काढून पूर्ण होणे
१३.१०.२०२३ या दिवशी संध्याकाळी मी सेवा करत असतांना ते दृश्य मला पुन्हा दिसले. मी माझ्या सर्व सेवा थांबवून देवाच्या प्रेरणेने चित्र काढायला आरंभ केला. आरंभी मला चित्र काढायला अवघड वाटत होते; पण माझ्याकडून ते चित्र २० ते २५ मिनिटांत काढून झाले. त्या वेळी ‘मी ते चित्र काढत आहे’, असे मला वाटत नव्हते.
३. चित्र काढत असतांना पाऊस पडून वातारणात पालट जाणवणे
त्या दिवशी दिवसभर ऊन होते. चित्र काढण्यापूर्वी दुपारी ४.४५ वाजता पिवळा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातच पाऊस पडू लागला. मला ते वातावरण पुष्कळ छान वाटत होते. ते चित्र काढून झाल्यावर पाऊस थांबला.
४. हे चित्र काढल्यानंतर माझ्या मनाला शांत वाटले. ‘चित्रातील अर्धनारीश्वराच्या नेत्रांत पुष्कळ मारक तत्त्व आहे’, असे मला जाणवले.
– कु. रजनीगंधा कुर्हे, (१३.१०.२०२३)
संपूर्ण ब्रह्मांड व्यापूनी आहे, अर्धनारीश्वर रूप तू ।
ब्रह्म तू, आदिमायाही तू ।
संपूर्ण ब्रह्मांड व्यापूनी आहे ।
अर्धनारीश्वर रूप तू ।। १ ।।
शिव-शक्ति तू ।
आदिमाया आदिशिव तू ।
अनादि अनंत तूची तू ।। २ ।।
सगुण-निर्गुण निराकार तू ।
नमस्कार या जिवाचा ।
शिव-शक्ति स्वरूपास ।। ३ ।।
सदैव आपल्या चरणी राहो अढळ श्रद्धा ।
हाच आशिष द्यावा ।
आपल्या अंशरूपास ।। ४ ।।
– कु. रजनीगंधा कुर्हे, (१३.१०.२०२३)
कु. रजनीगंधा कुर्हे यांनी रेखाटलेले अर्धनारीश्वराचे चित्र साधिकेच्या मनातील प्रश्नाला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘अध्यात्मात द्वैताकडून अद्वैताकडे जायचे असणे’ असे उत्तर देणे
प्रश्न : पूर्वी मला महाकाली अभिषेक करतांना दिसली होती. आता मला अर्धनारीश्वराचे रूप दिसले. ‘या चित्राचा भावार्थ काय असू शकतो ?’, हे कळू शकेल का ?’
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : महाकालीने शिवाचा अभिषेक करणे, याचा अर्थ शिव आणि शक्ती यांच्यामध्ये द्वैत आहे. याउलट अर्धनारीश्वराने शिवपिंडीला अभिषेक घालणे, याचा अर्थ शिव आणि शक्ती यांच्यामध्ये अद्वैत होणे. अध्यात्मात द्वैताकडून अद्वैताकडे जायचे असते. ती आणखी श्रेष्ठ भक्ती आहे. आता अर्धनारीश्वराचे चित्र दाखवून देवाने तुम्हाला ‘द्वैताकडून अद्वैताकडे जायचे आहे’, हे सुचवले आहे.
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |