मराठवाड्यातील ‘छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थे’त अपहार करणारे आरोपी अद्यापही पसार !
नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) – मराठवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेत आर्थिक अपहार करण्यार्या गुन्हेगारांना ३ मासांनंतरही पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणातील १० आरोपी अद्यापही पकडले गेले नाहीत, अशी माहिती ८ डिसेंबर या दिवशी गृहविभागाकडून विधानसभेत देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा तारांकित प्रश्न आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. शासकीय योजनेतून अल्प दरात विविध वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचा खोटा प्रचार करून तब्बल ९ सहस्र ८३१ गुंतवणूकदारांकडून १ कोटी १४ लाख ११ सहस्र ७०० रुपयांची फसवणूक झाल्याचे ऑगस्ट २०२३ मध्ये निष्पन्न झाले; मात्र साडेतीन मास होऊनही या प्रकरणातील १० आरोपी अद्यापही पसार आहेत. नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अपहारातील पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत; मात्र अद्याप केवळ ३ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.