पुणे येथील श्रीमद्भगवद्गीता पठणाच्या विक्रमाची नोंद ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये !
पुणे, १० डिसेंबर (वार्ता.) – स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर ३ डिसेंबर या दिवशी चैतन्यमय वातावरणात १० सहस्र ६८२ लोकांनी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत भावपूर्ण गीतापठण केले. यामध्ये विविध वयोगटांतील भाविकांनी सहभाग घेऊन गीतेतील ७०० श्लोकांचे उत्स्फूर्तपणे पठण करून विक्रम प्रस्थापित केला. ‘गीताधर्म मंडळा’च्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने या ‘गीतापाठ महायज्ञा’चे आयोजन केले होते. या अभूतपूर्व उपक्रमाची नोंद ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’च्या परिक्षिका डॉ. चित्रा जैन यांनी या रेकॉर्डची घोषणा करून या विक्रमाचे प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार आणि मंडळाच्या पदाधिकार्यांना प्रदान करून सन्मानित केले. या प्रसंगी पोलीस आयुक्त रितेशकुमार, उपायुक्त संदीप सिंह गिल, मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक गो.बं. देगलूरकर यांची वंदनीय उपस्थिती होती. या उपक्रमाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या उपक्रमाचा प्रसाद म्हणून सर्वांना भगवद्गीता, पाणी आणि खाऊ वाटप करण्यात आले.
या वेळी उपस्थित भाविक सौ. छाया वेदपाठक म्हणाल्या, ‘‘भगवद्गीतेचे १० सहस्र ६८२ भाविकांनी केलेले पठण म्हणजे भगवंताने प्रगट केलेले विश्वरूपदर्शनच होय. भगवद्गीतेचा प्रसार होण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुकृपेमुळे या अभूतपूर्व उपक्रमाचा आनंद मला आणि माझ्या मुलीला घेता आला त्याविषयी कोटी कोटी कृतज्ञता !’’