संपादकीय : जनतेचे भ्रष्ट (खासदार) सेवक !
६ डिसेंबर २०२३ या दिवशी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि झारखंडमधील एक बडे प्रस्थ असलेले धीरज साहू यांच्या निवासस्थानांसह १० ठिकाणी आयकर विभागाने धाडी घातल्या. झारखंड, ओडिशा आणि बंगाल या राज्यांमध्ये घातलेल्या धाडीत आतापर्यंत ३०० कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. ‘बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड’ हे धीरज साहू यांच्याशी संबंधित आस्थापन आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या मद्य उत्पादक आस्थापनांपैकी एक आहे. प्राप्तीकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर यांनी दिलेल्या माहितीनुसार एका कारवाईत आतापर्यंत वसूल करण्यात आलेली ही सर्वांत मोठी रक्कम आहे. ८ डिसेंबर या दिवशी ४० लहान-मोठ्या यंत्रांमधून नोटांची मोजणी चालू झाली, ती ९ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत चालू होती.
या धाडीनंतर धीरज साहू यांच्या घरातून जप्त झालेल्या नोटांच्या ढिगांची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या पैशांच्या थैल्या पाहून डोळे पांढरे होतील. ९ कपाटांतील नोटांची बंडले मोजतांना नोटा मोजणारी यंत्रे बंद पडली. ओडिशाच्या भागात असलेल्या मद्य कारखान्यांच्या देखभालीचे प्रभारी म्हणून नेमलेल्या बंटी साहू यांच्या घरातून अनुमाने पैशांच्या १९ बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पैशांच्या १५६ बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. बंटी साहू यांच्या घरात २० कोटी रुपयांहून अधिक रक्कम असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ‘काँग्रेसच्या एका खासदाराकडे एवढी प्रचंड रोकड सापडत असेल, तर काँग्रेसच्या इतर नेत्यांची संपत्ती किती असेल ?’, याची देशात चर्चा होऊ लागली आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही रोकड साठवून तर ठेवण्यात आली नसेल ना ?’, याविषयी संशय व्यक्त होत आहे. ‘ही रक्कम केवळ साहू यांची नसून यामध्ये इतर नेतेमंडळीही वाटेकरी असतील’, अशी शक्यता नाकारता येत नाही. याआधी देहली येथे सत्तेवर असलेले अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाभोवती मद्य धोरणातून केलेल्या कमाईच्या आरोपांचे वादळ उठले आहे. केजरीवाल यांचे २ साथीदार मद्य धोरणातील मलिद्याच्या आरोपावरूनच गजाआड आहेत.
भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ‘काँग्रेस’ !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभर पदभ्रमण केले. काँग्रेसने यास ‘भारत जोडो’ असे नाव दिले असले, तरी यात्रेच्या वेळी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात द्वेषाची बिजे पेरण्याचा त्यांचा उद्देश उघडकीस आला होता. या यात्रेच्या वेळी धीरज साहू यांना राहुल गांधींसमवेत मानाने मिरवतांना जनतेने पाहिले आहे. ‘या कमाईतील गांधी कुटुंबाचा वाटा किती असेल ?’, यावरही आता चर्चा झडू लागल्या आहेत. ‘साहू हे काँग्रेसी प्यादे असून या पटावरील बिनीचे मोहरे वेगळेच आहेत’, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
‘जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनसेवेच्या आणाभाका घेऊन जनतेशी कसे भ्रष्टपणे वागत असतात आणि यामध्ये काँग्रेसी नेत्यांचाच भरणा का असतो ?’, हा प्रश्न नवीन नाही. काँग्रेस आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत अन् या दोघांचे समीकरण जुनेच आहे. भ्रष्टाचाराच्या चिखलात आकंठ बुडाल्याने आणि एकामागून एका नेत्याच्या प्रतिमेवर नवे डाग उमटत असल्याने काँग्रेसचे नेते सैरभैर झाले आहेत. आता त्यांनी जनतेच्या मनातून संपूर्णपणे उतरण्याचा जणू चंगज बांधला आहे. २२ जून २०२३ या दिवशी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले, तर भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना कारागृहात टाकू. आता काँग्रेसचे नेतेच भ्रष्टाचार प्रकरणात सापडत असल्याने पटोले यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पंतप्रधान नरेंद्र मोदीच काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना कारागृहात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पटोले यांची बोलती बंद झाली आहे.
भ्रष्ट राजकारण्यांना शिक्षा होणे आवश्यक !
वर्ष २०२१ मध्ये देशातील १२२ राजकारण्यांच्या नावावर ‘मनी लाँड्रिंग’चे खटले असल्याची सूची ‘ईडी’ने सर्वाेच्च न्यायालयात दिली होती. यामध्ये अनेक राज्यांचे आजी माजी मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांचीही नावे आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम्, भाजपचे बी.एस्. येडियुरप्पा, काँग्रेसचे बी.एस्. हुड्डा, दिवंगत वीरभद्र सिंह, ओ इबोबी सिंह, गेगोंग अपांग, काँग्रेसचे नबाम तुकी, ‘एन्.सी.पी.’चे चर्चिल अलेमाओ, काँग्रेसचे दिगंबर कामत यांचाही समावेश आहे, तसेच गेल्या २ वर्षांत महाराष्ट्रात ‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख यांची चौकशी केली, त्या वेळी या नेत्यांकडे अवाढव्य संपत्ती असल्याचे आढळून आले आहे. लाच प्रकरणात लाच घेणारे अधिकारी सापडतात; मात्र ‘त्यांना शिक्षा झाली आहे’, असे कधीही ऐकायला मिळत नाही, तसेच राजकीय पक्षांतील नेते भ्रष्टाचारांच्या प्रकरणात सापडतात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे असे लोक समाजात बिनधास्त फिरत असतात. ईडी, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय), विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) आणि आयकर विभाग अशा अन्वेषण यंत्रणा अनेक दिवस कष्ट घेऊन विविध पक्षांतील नेत्यांचा भ्रष्टाचार, त्यांची संपत्ती बाहेर काढतात; मात्र नंतर ‘या संपत्तीचे काय झाले ?’, ‘भ्रष्ट नेत्यांवर कारवाई झाली का ?’, याची माहिती जनतेला मिळत नाही. यासाठी राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासह त्यांना कठोर शिक्षाही झाली पाहिजे, तरच या अन्वेषण यंत्रणांनी केलेल्या कामाचा लाभ देशाला होईल. याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाराजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासह त्यांना कठोर शिक्षाही होणे अपेक्षित आहे ! |