परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
१. अनिष्ट शक्तींचे त्रास न्यून झाल्यावर भावना नष्ट होऊन भावाची अनुभूती येते !
सौ. वैष्णवी पिसोळकर : कधी कधी माझ्या मनाची अशी अवस्था असते की, भावना निघून गेली आहे; परंतु भावाची जी स्थिती असणे आवश्यक आहे, तेथपर्यंत मी पोचू शकले नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : वेळ यावी लागते ना ! भावना मानसिक स्तरावर असते. भाव हा आध्यात्मिक स्तरावरचा असतो. वाईट शक्तींचे सर्व त्रास न्यून झाले किंवा दूर झाले की, भावाच्या स्थितीची अनुभूती येईल. आता तो विचार करायचा नाही.
२. धावपळीच्या सेवेपेक्षा बैठी सेवा करतांना भाव ठेवायला सोपे जाते; पण हळूहळू धावपळीच्या सेवेतही भाव ठेवायला जमू लागेल !
एक साधिका : गुरुदेव, आरंभी मी स्वयंपाकघरात सेवा करत होते. तेव्हा मी एका ठिकाणी बसून सेवा करत होते. त्या वेळी मी भाव ठेवून सेवा करू शकत होते; परंतु आता मला धावपळीची सेवा असते. त्यामुळे मी भाव ठेवू शकत नाही. सेवा पूर्ण झाल्यानंतर ते माझ्या लक्षात येते आणि ‘या सेवेत भाव ठेवू शकले नाही’, याचे मला वाईट वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : बसून सेवा करतांना भाव ठेवायला सोपे होते. जेव्हा चालणे-फिरणे, दुसर्या किंवा तिसर्या माळ्यावर जाणे, असे असेल; तेव्हा तिकडेच लक्ष रहाते. हळूहळू तेसुद्धा जमेल.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी पोचण्याइतकी साधना नसतांनाही त्यांनी जवळ केल्याबद्दल साधकाला कृतज्ञता वाटणे
श्री. राजेश दोंतुल : गुरुदेव, मला वाटते, ‘भारतभरात जे कुणी सनातनचे साधक आहेत, ते अत्यंत भाग्यवान आहेत. विष्णुलोकातील ‘जय’ आणि ‘विजय’ यांना ते ‘द्वारपाल’ असल्यामुळे श्रीविष्णूच्या दाराजवळच थांबावे लागले होते. त्यांच्यासारखी आमची कुणाचीही साधना नाही आणि आम्ही तेवढी साधना करूही शकत नाही, तरीही ‘आपण स्वतःच आम्हाला आपल्या चरणी घेऊन आलात’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले (साधकांना उद्देशून) : बाकी साधकांमध्ये अहंभाव असतो. ‘आदर्श साधक’ कसा असतो, तर (श्री. राजेश दोंतुल यांच्याकडे निर्देश करून) असा ! त्याच्यामध्ये नम्रता असते आणि अहं नसतो. पुष्कळ छान !
४. नामजपादी उपाय करतांना ज्यांच्याप्रती मनात दृढ श्रद्धा आणि भाव आहे, त्यांचे स्मरण केल्यावर अनिष्ट शक्ती दूर पळून जातात !
श्री. राजेश दोंतुल : परवा मला पुष्कळ निराशा आली आणि ‘झोपून जावे, सेवा करू नये’, असे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘दुसरे कुणीतरी माझ्या मनात हे विचार घालत आहे.’ मी १ – २ घंटे झोपलो आणि नंतर उठून सद्गुरु काकांकडे (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडे) गेलो. तेव्हा सद्गुरु काका मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही समष्टी कार्य करत आहात ना ! तुम्ही साधनेत पुढे चालला आहात. त्यामुळे अनिष्ट शक्ती तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करणारच !’’ त्यांनी मला त्यावर नामजपादी उपाय सांगितले. मला जाणवते, ‘जेव्हा अनिष्ट शक्ती माझ्या जवळ येतात, तेव्हा त्यांना माझ्या जवळ आपणच (गुरुदेव) दिसता आणि आपल्याला पाहून त्या लांबूनच पळून जातात. त्या माझ्या जवळ फिरकतच नाहीत.’ मी नामजपादी उपाय केले किंवा केले नाहीत, तरीही आता मला चांगले वाटते. त्यामुळे ‘समष्टी साधनेत मिळणारा आनंदच माझे सर्वकाही आहे’, असा विचार माझ्या मनात येतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ज्या वेळी तुम्ही नामजपादी उपाय करता, त्या वेळी ज्यांच्याप्रती तुमच्या मनात श्रद्धा आणि भाव आहे, त्यांचेच विचार मनात आले, तर अनिष्ट शक्ती दूर पळून जाते.’
(सप्टेंबर २०२०)
(क्रमशः)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |