विधानसभा अधिवेशनाच्या काळात अनावश्यक विषयांवर अकारण चर्चा !
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने…
१. विरोधक उदासीन, तर सत्ताधारी उत्साही !
यंदा चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकर्यांच्या पिकांची हानी, भ्रष्टाचार आणि आरक्षण या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे, तर शेतकर्यांना साहाय्य करण्याचे संकेत देऊन सरकारने विरोधी पक्षाची कोंडी करून त्यांना सडेतोड उत्तर देण्याचा चंग बांधला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या चेहर्यांवर उदासीनता दिसून येत होती. पत्रकार परिषदेच्या वेळी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार बोलत असतांना जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण डुलकी घेत होते. यावरून विरोधी पक्षांतील नेते आणि आमदार हतबल झाल्याचे चित्र समोर आहे. दुसरीकडे सत्ताधार्यांची पत्रकार परिषद हसत खेळत झाली. तेथे उत्साही वातावरण होते.
२. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरून वाद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचे अधिवेशनात पडसाद उमटले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा वाद चालू झाला. विधीमंडळ परिसरात असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी प्रत्युत्तर म्हणून काही घंट्यांतच पुन्हा काढण्यात आली. यापूर्वी या ठिकाणी अजित पवार गटाचे प्रतोद (विधीमंडळाचे नेते) अनिल पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. या विषयावरून माध्यमांसह सर्वत्र अकारण आणि अनावश्यक चर्चा होत आहे. अधिवेशनाच्या अल्प कालावधीत एकेक मिनिट महत्त्वाचा असतांना अशी चर्चा कितपत योग्य आहे ?, याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
३. अवेळी पावसामुळे झालेल्या पीकहानीचे गांभीर्य हवे !
राज्याच्या बहुतांश भागात अवेळी पाऊस झाला. पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांना गारपिटीचा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा पिकांची अतोनात हानी झाली. या हानीचे आकडे वाढतच आहेत. कृषी विभागाने दिलेल्या ५ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात ५ लाख २५ सहस्र ६७१ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यवतमाळला मोठा फटका, म्हणजेच सर्वाधिक १ लाख २६ सहस्र ४३८ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. प्रशासनाकडून पंचनामे चालू असतांनाच पुन्हा पूर्व विदर्भात अवेळी पावसाने उपस्थिती लावली आहे. त्यामुळे पुन्हा पिकांची हानी होणार.
या सर्व गोष्टींचा विचार करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची अधिवेशनात चर्चा करून त्यावर जनतेच्या हिताचे निर्णय घेणे, हेच लेाकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे !
– श्री. सचिन कौलकर, नागपूर. (८.१२.२०२३)
संपादकीय भूमिकाअनावश्यक विषयांवर चर्चा करणारे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कधी गांभीर्याने सोडवू शकतील का ? |