वीर सावरकर उवाच
सर्व जगात अत्यंत जुना असा ऋग्वेद या भूमीत निर्माण झाला. तत्त्वज्ञानाला दहा सहस्त्र वर्षांपूर्वी शोधून काढणारे वीर्यवान ऋषि जगावर इतरत्र कुठे आढळणार आहेत? त्या ऋषींच्या तपोवनांनी आणि त्यांच्या तपाने पूत झालेल्या भारतमातेला आमचे वंदन असो ! ऋग्वेद या भूमीचा आहे, अथर्ववेद या भूमीचा आहे, यजुर्वेद या भूमीचा आहे, सामवेद या भूमीचा आहे. ब्राह्मणे आणि उपनिषदे या भूमीची आहेत. तत्त्वज्ञानाची भागीरथी या भूमीच्या चरणकमलापासून उगम पावली आहे. शुक, वसिष्ठ इत्यादी परब्रह्मवेत्ते ब्राह्मण याच भूमीत निर्माण झाले होते. अंगिरस, वसिष्ठ, वामदेव, याज्ञवल्क्य, भृगु ही विभूतीमान नावे ऐकताच कोणाच्या मनाला एकदम उदात्तता प्राप्त होत नाही?
(साभार : तेजस्वी तारे, वन्दे मातरम् समग्र सावरकर खंड चौथा)