राज्यात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री !
वर्षभरात ४७० गुन्हे नोंद !
नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात वर्ष २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांच्याकडून वारंवार कारवाया करूनही अद्यापही महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे.
वर्ष १ एप्रिल ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात ६७६ ठिकाणी धाड टाकून ४७० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये ९५ वाहने पोलिसांनी कह्यात घेतली असून ४१३ आस्थापनांना सील करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत १७ कोटी ६४ लाख ७६ सहस्र ६७४ रुपये किमतीच्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा कह्यात घेण्यात आला. या प्रकरणी ७०९ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शाळांच्या परिसरामध्ये गुटखा, अमली तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीविषयीचा तारांकित प्रश्न ८ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला होता. याविषयी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून वरील माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायद्यान्वये १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २१३ ठिकाणी कारवाई करून ४४ सहस्र ९९९ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
संपादकीय भूमिकाराज्यातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना केव्हा करणार ? |