राज्यात बालगुन्हेगारीची २१ सहस्रांहून अधिक प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत !
नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) – बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्यापुढे निकालासाठी आलेली २१ सहस्रांहून अधिक पदे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. याविषयी ८ डिसेंबर या दिवशी विविध पक्षांच्या आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत बाल कल्याण समितीपुढे एकूण ५१ सहस्र ७४४ प्रकरणे आली. यांतील ४७ सहस्र ५४० प्रकरणे निकालात काढण्यात आली असली, तरी अद्यापही ४ सहस्र २०४ इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे न्यायासाठी प्रलंबित आहेत. याच कालावधीत बाल न्याय मंडळापुढे २७ सहस्र ८३४ प्रकरणे न्यायालयाची आली. यांतील तब्बल १७ सहस्र ५३३ प्रकरणांमध्ये अद्यापही निकाल लागलेला नाही. महिला आणि बाल कल्याण मंत्री कु. अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत ही प्रकरणे निकालात काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समिती यांकडे निकालासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांविषयी तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर महिला आणि बाल कल्याण विभागाकडून वरील माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात भावी पिढी गुन्हेगारीत अडकणे समाजासाठी हानीकारक आहे. संस्कारमय पिढी घडण्यासाठी मुलांना बालवयापासून नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे. |