धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यास रामराज्य येईल ! – पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी)
आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी ५०० हून अधिक वारकर्यांच्या उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार !
आळंदी (जिल्हा पुणे) – जेव्हा नेता चुकतो, तेव्हा धर्मपिठाने त्याच्यावर अंकुश ठेवायचा असतो. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असणे आवश्यक आहे. जर धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्या, तर भारतात रामराज्य येईल, असे वक्तव्य पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी केले. ९ डिसेंबर या दिवशी आळंदीमधील गोपाळपुरा येथील श्री देविदास धर्मशाळा तथा ‘वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिरा’त आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या वारकरी अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी ५०० हून अधिक वारकरी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात नामवंत संत-महंत, मान्यवर, ह.भ.प. धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी एकमुखाने कुठल्याही परिस्थितीत ‘हलाल’ उत्पादने विकत घेणार नाही, तसेच हिंदुत्वनिष्ठांवर होत असलेल्या अन्यायाविषयी, तसेच विविध कथित गुन्ह्यांत जे अटकेत आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचा निर्धार व्यक्त केला.
धर्मकार्य करणार्या कुठल्याही संस्थेला अडचणीत आणले जात असेल, तर आपल्या सर्वांना एक होऊन सरकारला जागे करावे लागेल !
पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) पुढे म्हणाले, ‘‘आपल्याला जागृती करण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका स्तरापर्यंत गोवंशहत्या बंदी, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा, इंद्रायणी नदीची स्वच्छता आदी गोष्टींच्या संदर्भात सक्रीय होऊन निवेदन द्यावे लागेल. धर्मकार्य करणार्या कुठल्याही संस्थेला अडचणीत आणले जात असेल, तर आपल्या सर्वांना एक होऊन सरकारला जागे करावे लागेल. यासाठी या अधिवेशनातील ठरावांना सर्वांनी उत्स्फूर्तपणे अनुमोदन देऊन आपला आवाज शासनापर्यंत पोचवावा.’’
प्रास्ताविक देविदास धर्मशाळेचे ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी केले. याप्रसंगी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी अधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव तात्काळ शासन दरबारी पोचवून त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
उपस्थित मान्यवर
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. जय महाराज, ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्त्री, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अर्जुन महाराज रासकर, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे, ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांसह विविध मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
घोषणा
या अधिवेशनात ‘हर हर महादेव ।’, ‘सियावर रामचंद्रकी जय ।’, ‘पवनसुत हनुमान की जय ।’, ‘वन्दे मातरम् ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ।’, ‘भारतमाता की जय ।’ अशा घोषणांमुळे वीरश्री निर्माण झाली होती.
क्षणचित्रे
१. या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदीच्या विश्वस्तपदी निवड झाल्याविषयी ह.भ.प. निरंजननाथजी महाराज, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, पंडित मनोज शर्मा यांचा ‘धर्मगुरु’ अशी पदवी मिळाल्याविषयी दंडी स्वामीजींच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
२. या प्रसंगी कु. ईश्वरी पाटील (वय ९ वर्षे) आणि कु. श्रीकृष्ण पाटील (वय ६ वर्षे) या दोन बाल धर्मप्रेमींनी धर्मप्रेम अन् राष्ट्रप्रेम उत्पन्न करणार्या घोषणा उत्स्फूर्तपणे दिल्या.
३. अधिवेशनाच्या ठिकाणी वैकुंठवासी प.पू. वक्ते महाराज यांचे छायाचित्र असलेली पालखी व्यासपिठावर ठेवण्यात आली होती.
४. ह.भ.प. वेणुनाथ विखे महाराज हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वारकर्यांना घेऊन या अधिवेशनात सहभागी झाले होते.
‘श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर हे सातत्याने धर्मकार्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे देविदास धर्मशाळेचे ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे’, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी या प्रसंगी केले.