वीर सावरकर रत्नागिरीकरांची अस्मिता ! – बाळ माने, माजी खासदार, भाजप
|
रत्नागिरी – कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे रत्नागिरीत भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी युवा अध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार तथा भाजपचे रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध नोंदवला.
‘वि.दा. सावरकर हे वीर नव्हते. जर मी प्रभारी असतो, तर सुवर्ण विधानसभेत लावण्यात आलेला त्यांचा फोटो काढून टाकला असता, असे सावरकरद्वेषी वक्तव्य मंत्री खर्गे यांनी केले. यामुळे देशभरात भाजप युवा मोर्चाकडून निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार बाळ माने म्हणाले की,
१. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान उल्लेखनीय आहे. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही.
२. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी आहे. त्यामुळे त्यांचा सातत्याने अपमान करणार्या काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या नेत्यांना ‘जोडे मारो’ आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निर्वाणीची चेतावणी देत आहोत.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला मिळणार्या विजयापासून जनतेचे लक्ष विचलित व्हावे, याकरता काँग्रेसने स्वातंत्र्यविरांवर टीका केली आहे. रत्नागिरी ही स्वातंत्र्यविरांची कर्मभूमी आहे. आम्ही तीव्र शब्दांत धिक्कार करतोय. सावरकर ही आमची सर्वांची अस्मिता आहे.
४. सावरकरांचे हिंदुत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. त्याला कुणी गालबोट लावत असेल, तर भाजप कुणाचीही गय करणार नाही. स्वातंत्र्यविरांचे हिंदुत्वाचे विचार जनतेला प्रेरणादायक आहेत.
या वेळी युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विक्रम जैन, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर, राजापूर (पश्चिम) महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार, पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.