ग्रामविकास अधिकारी चिपळूणकर यांची वेतनवाढ रोखली ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री
|
नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील ऐनघर (तालुका रोहा) ग्रामपंचायतींमध्ये १९ लाख १९ सहस्र ६६९ रुपयांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर यांची २ वर्षांची वेतनवाढ रोखली असून या प्रकरणाचे विभागीय अन्वेषण चालू आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हा प्रश्न विचारला होता. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महादेव मोहिते यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच चंद्रकांत शिंदे, ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर, ग्रामसेवक अनंत मेश्राम, तत्कालीन प्रभारी सरपंच दिनेश जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्यांसह १७ जणांवर नागोठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.