राज्यातील ‘लेक लाडकी योजना’ केवळ कागदावरच; अद्यापही निधीचे प्रावधान नाही !
नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना ‘लखपती’ करण्याचा निर्णय ३० ऑक्टोबर या दिवसापासून या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. पिवळ्या आणि केशरी शिधाकार्डधारक कुटुंबास ही योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे; परंतु अद्यापही या योजनेसाठी निधीचे प्रावधान करण्यात आले नाही. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच रहाणार कि काय ? योजनेचा लाभ प्रत्यक्षात केव्हा मिळणार ? असा प्रश्न मुलींच्या कुटुंबांना पडला आहे. मुलगी जन्मल्यापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे देण्यात येणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर अल्प करणे आणि बालविवाह रोखणे, कुपोषण अल्प करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेचे स्वरूप ‘लेक लाडकी योजने’मध्ये महाराष्ट्रामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या कुटुंबाला ५ सहस्र रुपये, मुलगी इयत्ता १ लीच्या वर्गामध्ये गेल्यावर ६ सहस्र रुपये, इयत्ता ६ वीच्या वर्गात ७ सहस्र रुपये, इयत्ता ११ वीमध्ये ८ सहस्र रुपये, तर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ सहस्र रुपये असे एका मुलीस एकूण १ लाख १ सहस्र रुपये एवढा लाभ मिळेल.