निधीअभावी ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ बंद ! – तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री
विधान परिषद प्रश्नोत्तर…
नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पी.सी.पी.एन्.डी.टी.) कायद्याच्या कार्यवाहीसाठीचे ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ वर्ष २०१९ पासून बंद आहे. हे संकेतस्थळ चालवणारे ‘परामर्श सोल्युशन’ हे आस्थापन बंद झाले आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने हे संकेतस्थळ बंद आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेमध्ये लेखी तारांकित प्रश्नोत्तरात दिली. (याविषयी आरोग्य विभागाने तत्परतेने कार्यवाही करून संकेतस्थळ चालू करणे अपेक्षित होते. – संपादक) या संदर्भात सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीकडून (‘यु.एन्.एफ्.पी.ए.’ला) आरोग्य विभागाला आर्थिक साहाय्य मिळत होते. ते वर्ष २०१९ पासून थांबलेले आहे. त्यामुळे संकेतस्थळाला देण्यात येणारे आर्थिक साहाय्यही बंद झाले आहे. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘राज्य पर्यवेक्षकीय मंडळा’कडून गेल्या ३ वर्षांत केवळ २ बैठका घेण्यात आल्या आहेत.