श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाची पूजा पूर्वापार करत आलेल्या बडव्यांचे महत्त्व लक्षात घ्या !
‘श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरावर सरकारचा अधिकार आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी श्री विठ्ठलाची पूजा मागील शेकडो वर्षांपासून जशी चालू आहे, तशीच याहीपुढे व्हावी, याविषयी कोणाचेही दुमत नसावे. सरकारी व्यवस्थेत बसलेल्या काही विरोधकांनी श्री विठ्ठलाची पूजा करणार्या बडव्यांना हटवून नवीन पुजार्यांची नेमणूक केली आहे. शेकडो वर्षांपासून वंशपरंपरेने पूजा करणारे बडवे आणि दोन-चार मासांत शिकून पूजा करणारे नवीन पुजारी यांच्यापैकी पूजेतील गुणवत्तेत श्रेष्ठ कोण ?, हे कोणी सांगायला नको.
श्री विठ्ठलाची पूजा करणारे नवीन पुजारी दोन-चार अभंग म्हणून पूजा आटोपत आहेत. पूजा जितकी शास्त्रोक्त तितके मूर्तीतून चैतन्य प्रक्षेपित होण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे वंशपरंपरेनुसार शास्त्रोक्त पूजाविधी करणार्या बडव्यांचे महत्त्व प्रशासनाला समजत नसले, तरी वारकरी आणि विठ्ठलभक्त यांनी ते समजून घेतले पाहिजे आणि श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी बडव्यांचीच नियुक्ती करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
समाजातील बर्याच घराण्यांमध्ये वंशपरंपरात एखादा व्यवसाय पुढील पिढ्यांच्या हाती सुपुर्द केला जातो. मनुष्यातील काही गुण हे अनुवंशिकदृष्ट्या पुढील पिढीकडे संक्रमित होत असतात. त्यामुळे एखाद्याने घराण्याचा वंशपरंपरागत व्यवसाय केल्यास पुढील पिढीमध्ये आपसूकरित्या ते गुण संक्रमित होतात. त्यामुळे वंशपरंपरागत व्यवसायात अल्प कालावधीत अधिक कौशल्य विकसित होते. प्राचीन काळापासून मध्ययुगापर्यंत विविध कला, विद्या आदी क्षेत्रांत भारतीयच सर्वश्रेष्ठ होते. याचे कारण सर्वजण वंशपरंपरागत क्षेत्रातच व्यवसाय करत असत, हे आहे. पौरोहित्यामध्ये शुद्धता, सात्त्विकता आदी गुण असणे अपरिहार्य आहे. वंशपरंपरेने पौरोहित्य पुढील पिढीनेही चालवल्यास त्याचा दर्जा टिकून रहातो. त्यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पूजा बडव्यांनी करणे श्रेयस्कर ठरते. याकडे जातीयवादातून न पहाता सामाजिक हिताच्या दृष्टीने पाहिल्यास सर्वांचेच भले होईल.