मंदिर-न्यास परिषदेची फलनिष्पत्ती !
मंदिरसेवकांना संघटित केले…
धर्माभिमान्यांना एकत्र केले…
भाविकांना आपलेसे केले…
महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त अधिवेशन’ !
१६ जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त अधिवेशना’त स्थानिक विश्वस्तांचे एकत्रीकरण करून स्थानिक मंदिराच्या अडचणी आणि समस्या यांवर चर्चा होईल !
सरकारीकरण, मंदिर व्यवस्थापन, देवनिधी, धर्मकार्य आदी विविध विषयांच्या संदर्भात त्यांचे प्रबोधन करणे, तसेच आर्थिक स्थिती चांगल्या नसलेल्या मंदिरांना साहाय्य, मंदिरांत धर्मशिक्षण देणारे ग्रंथालय, धर्मशिक्षण देणारे फलक लावणे, वस्त्रसंहिता, मंदिरांचा परिसर मद्य-मांस मुक्त करण्यासाठी प्रयत्न आदी उपक्रम राबवले जातील !
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत विश्वस्तांनी सर्वानुमते केलेले ठराव !
हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनी परिषदेच्या समारोपाच्या वेळी वरील ठरावांचे वाचन केले. विश्वस्तांनी ‘हर हर महादेव’ या घोषात हात उंचावून या ठरावांना पाठिंबा दिला. |
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेची फलनिष्पत्ती !
समान कृती कार्यक्रम निश्चित !
|
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे ध्येय !५०० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा संकल्प ! मंदिरातील सात्त्विक वातावरणाचा लाभ करून घेण्यासाठी सात्त्विक वेशभूषाही महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये आखाडा परिषदेच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू झाली. तुळजापूरच्या मंदिरात वस्त्रसंहितेचा फलक लागल्यानंतर प्रसारमाध्यमांनी केलेल्या विरोधाला बळी पडत मंदिर व्यवस्थापनाकडून वस्त्रसंहिता मागे घेतली गेली. मंदिरांमधील धार्मिक परंपरांचा निर्णय प्रसारमाध्यमांनी नव्हे, तर तेथील देवस्थान समितीने घ्यायला हवा. ‘सेक्युलर’ सरकारच्या कार्यालयात येतांना वस्त्रसंहिता असू शकते, तर मंदिरात का नाही ? वर्ष २०१६ मध्ये तमिळनाडू येथील उच्च न्यायालयाने तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय दिला. आज भारतात अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे. अनेक ढोंगी पुरोगामी नेते वस्त्रसंहिता लागू झाल्यावर असंबद्ध वक्तव्ये करून विरोध करतात; मात्र तेच नेते अन्य राज्यांत जाऊन हिजाबचे समर्थन करतात. आज सर्वच क्षेत्रात ड्रेस कोड असतांना मंदिरात जातांना पावित्र्य, परंपरा, मांगल्य जपण्यासाठी ड्रेस कोड का नको ? त्यामुळे विरोधाला न घाबरता मंदिर-न्यास परिषदेत ५०० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा संकल्प करण्याचा ठराव करण्यात आला आहे ! गेल्या वर्षभरात मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याच्या अभियानाला समाजातून आणि भाविक भक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज महाराष्ट्राभरातील २६४ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता स्वयंस्फूर्तीने लागू होत आहे आणि महाराष्ट्राचा आदर्श घेऊन अनेक राज्यांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्याची पावले उचलली जात आहेत. त्यामुळे आता हे अभियान संपूर्ण देश पातळीवर पोचले आहे ! |
गोवा आणि कर्नाटक राज्यांतही मंदिर-न्यास परिषद !मंदिर महासंघाच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आता गोवा राज्यातही १० डिसेंबरला मंदिरांचे व्यापक संघटन व्हावे, यासाठी मंदिर-न्यास परिषद होत आहे. १६ आणि १७ डिसेंबरला कर्नाटक राज्यात मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांची परिषद होत आहे. अशाच प्रकारचे व्यापक संघटन निर्माण होऊन येत्या वर्षभरामध्ये राष्ट्रीय पातळीवर मंदिर महासंघाची स्थापना होऊन देशभरातील सर्व मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी या सर्वांच्या पाठीशी उभे रहाणारे, त्यांना न्याय देणारे, त्यांच्या अडचणी सोडवणारे आणि त्या सर्वांचे संघटन करणारे एक व्यासपीठ उभे राहील. महाराष्ट्रातही सरकारला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाला मंदिरांच्या क्षेत्रात कार्य करणारी अधिकृत संघटना म्हणून घोषित करा !’ अशी मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून मंदिरांच्या संदर्भातील सर्व समस्या, अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध होईल ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती |
मंदिरांच्या भूमी परत मिळवण्याच्या संदर्भातील लढ्याला साहाय्य करणार !मंदिरांशी संबंधित अनेक समस्या असतात. अनेक ठिकाणी राजकीय मंडळींनी मंदिरातील जागा बळकावल्या आहेत, त्या विकल्याही आहेत. काही मंदिरांच्या जागांवरती अतिक्रमणे केलेली आहेत. या प्रकरणात नेमके कसे लढायचे ? हे लक्षात येत नाही. त्यांचे खटले चालू असतात; परंतु निधीचा अभाव कायदेशीर माहितीचा अभाव यांमुळे हा लढा देणे अवघड जाते. मंदिरांची शेकडो एकर भूमी असतांना देखील मंदिरे यासंदर्भात लढा देण्यासाठी अपुरी पडत आहेत. आज अनेक मंदिरांकडे भूमी आहे; परंतु ती भूमी कुठे आहे ? मंदिरांनी भूमी परत कशा मिळवायच्या ? आणि त्याचे उत्पन्न मंदिरासाठी कसे वापरले गेले पाहिजे या सर्व गोष्टींचा जर विचार झाला आणि या भूमी मंदिरांना पुन्हा मिळाल्या, तर निश्चितपणे अशी मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला होण्यासाठी कार्यरत होतील. हा सर्व लढा देण्यासाठी पुढच्या काळात मंदिर महासंघ जागृती करेल. – श्री. सुनील घनवट |
गाव तेथे मंदिर महासंघ !मंदिर विश्वस्तांना बर्याचदा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अडचणी येत असतात. विकासकामांसाठी, सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी मंदिरांकडून पैसे मागण्यात येतात आणि तसा आग्रही केला जातो. आपण जर धर्मादाय आयुक्त कार्यालयाला साहाय्य केले नाही, तर उद्या आपल्याला ते अडचणीत आणू शकतात, या भीतीपोटी अनेक मंदिर विश्वस्तांनी सामुदायिक सर्वधर्मीय सोहळ्यांसाठी साहाय्य केले; परंतु वास्तविक पाहता मंदिराने अशा कुठल्याही सामाजिक कार्याला किंवा विवाह सोहळ्यांना साहाय्य करावे, अशी तरतूदच नाही; परंतु कायद्याची माहिती नसल्याने आणि काही धर्मादाय आयुक्तांच्या प्रति मनामध्ये असलेल्या भीतीमुळे अशा गोष्टी मंदिर विश्वस्तांकडून अनावधानाने केल्या जातात आणि देवनिधीचा अपव्यय होतो. |
मंदिर विश्वस्तांच्या अडचणी सोडवणारमंदिर विश्वस्त कार्यालयामध्ये वार्षिक ताळेबंद किंवा हिशोब ‘ऑनलाईन’सादर करण्याची व्यवस्थित सुविधा देत नाहीत. वास्तविक पाहता सरकारच्या प्रत्येक विभाग हा ‘ऑनलाईन’ झालेला असतांना सुद्धा धर्मादायी आयुक्त कार्यालयत भरणा करत असताना किंवा ताळेबंद सादर करतांना त्या मंदिराच्या विश्वस्तांना समोर बोलावून, त्या ठिकाणी सर्व पुन्हा सर्व पडताळले जाते. हे कशासाठी ? तर तिथे विश्वस्तांकडून काही आर्थिक अपेक्षा असतात, असे त्यांना लक्षात येते. प्रत्यक्ष ताळेबंद सादर करतांना विश्वस्तांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते. एखाद्या विश्वस्तांचे नाव कमी करायचे असेल, नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करायचे असेल किंवा धर्मदायुक्तांची वेळ घ्यायची असेल, (कित्येकदा वेळच मिळत नाही) तरी अडचणी येतात. शेकडो किलोमीटर दूरचा प्रवास करून आल्यानंतरही कित्येकदा धर्मदाय आयुक्त उपलब्ध नसतात. किंवा पुढच्या वेळी येण्यासाठी सांगितले जाते. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कोण प्रयत्न करणार ? एकटे मंदिराचा कसा लढा देणार ? त्यामुळे कुठेतरी संघटनाची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत. |
मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात व्यापक लढा देण्याचा द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा निर्धार !या परिषदेत सरकारीकरण झालेली मंदिरे भाविकांची कशा प्रकारे लूट करतात ? धार्मिक परंपरा कशा प्रकारे डावलल्या जातात ? या संदर्भात ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी पंढरपूर येथील देवस्थानाने विविध माध्यमांतून केलेला भ्रष्टाचार, डॉ. अमित थडानी यांनी मुंबई येथील अष्टविनायक देवस्थान मंदिरातील घोटाळे, श्री तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी तुळजापूर देवस्थानचा घोटाळा, तसेच कोल्हापूर येथील श्री अंबाबाई भक्त समितीचे संस्थापक श्री. प्रमोद सावंत यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने होणारे भ्रष्टाचार मंदिर-न्यास परिषदेत सर्वांसमोर मांडले. ‘निधर्मी शासनप्रणालीत सरकार मशीद, चर्च यांचे सरकारीकरण करत नाही, तर केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का करते ?’, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. ‘हिंदूंची धार्मिक स्थाने असलेल्या मंदिरांचे व्यवस्थापन धर्मनिरपेक्ष सरकार करू शकत नाही, हे न्यायालयांनी अनेक वेळा सांगूनही आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मंदिर सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत’, असा ठराव समारोपाप्रसंगी करण्यात आला. |
देवतेचे दर्शन झाल्यावर करावयाच्या कृती !
देवतेला प्रदक्षिणा घालणे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या (गाभार्याच्या) बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे रहावे आणि मग प्रदक्षिणेला आरंभ करावा. देवतेला धन, नारळ इत्यादी दान करणे देवतेला अर्पण करावयाची वस्तू देवतेच्या अंगावर न टाकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. जर मूर्ती दूर असेल, तर ‘मूर्तीच्या चरणांवर अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवून ती देवतेसमोरील ताटात ठेवावी. तीर्थ आणि प्रसाद ग्रहण अ. तीर्थग्रहण प्रदक्षिणेनंतर उजव्या हाताच्या पंज्याच्या मध्यभागी तीर्थ घेऊन प्यायल्यावर हाताचे मधले बोट आणि अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत आणि मग ती कपाळावरून डोक्यावर सरळ वरच्या दिशेने फिरवावीत, म्हणजे ब्रह्मरंध्र, मस्तक आणि मान या ठिकाणी लावावीत. आ. प्रसादग्रहण १. प्रसाद घेतांना नेहमी उजव्या हातात घ्यावा. २. प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने वाकावे. ३. प्रसादाकडे बघून आपली उपास्यदेवता किंवा गुरु यांचे स्मरण करावे. ४. देवळातच बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा आणि त्यानंतर प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा. ५. प्रसाद ग्रहण केल्यानंतर उभे राहून देवाला मानस नमस्कार करावा. देवळातून निघतांना करावयाच्या कृती देवळातून निघतांना देवतेला परत एकदा नमस्कार करून ‘तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे’, अशी तिला प्रार्थना करावी. देवालयातून दर्शन घेऊन परत फिरतांना देवाकडे पाठ न फिरवता सात पावले मागे यावे. देवळाबाहेर आल्यानंतर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मगच प्रस्थान करावे. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’) |