ऐरोली येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाचा मोर्चा !

३०० हून अधिक हिंदूंचा सहभाग

मोर्च्यात सहभागी धर्मप्रेमी हिंदू

नवी मुंबई – ऐरोली येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ९ डिसेंबर या दिवशी सकाळी ऐरोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात ३०० हून अधिक हिंदू सहभागी झाले होते.

ऐरोली सेक्टर २ परिसरात मटणाचा व्यवसाय करणार्‍या एका धर्मांधाने या परिसरात दुकानातील दुर्गंधीयुक्त कचरा फेकला होता. या प्रकरणी स्थानिक रहिवाशांनी त्यांना खडसावले; पण त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर धर्मांधाने सेक्टर ३ मधील अनधिकृत प्रार्थनास्थळात धावत जाऊन धर्मबांधवांना निरोप दिला. अचानक या प्रार्थनास्थळामधून ६० ते ७० जणांनी तक्रारदार कुटुंबावर आक्रमण केले. यात महिला आणि तिचे यजमान यांना गंभीर मारहाण केली.

मशीद असलेला भूखंड मैदान आणि उद्यान यांसाठी राखीव आहे. या घटनेमुळे या परिसरातील महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. परिणामी ‘येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या प्रकरणी सकल हिंदु समाजाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती; मात्र त्यांनी याविषयी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे हा हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.