चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया, रायगड जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या !
नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्रात चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया आणि रायगड या जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या होत आहेत. या सर्व प्रकरणांत गुन्हे नोंद झाले आहेत. आमदार आशिष जयस्वाल यांनी ‘जुगार खेळण्याचे आवाहन करणार्या विज्ञापनांवर सरकार बंदी घालणार आहे का ?’, असा तारांकित प्रश्न ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केला होता. वेळेअभावी सभागृहात यावर चर्चा झाली नाही; मात्र गृहविभागाकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरातून ‘ऑनलाईन गेमिंग’ची भयावहता दिसून येत आहे.
वर्ष २०२१ मध्ये ‘ऑनलाईन गेमिंग’प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत २५ गुन्हे नोंद झाले असून ३७ जणांना अटक झाली. वर्ष २०२२ मध्ये ८ गुन्हे नोंद होऊन ११ जणांना अटक झाली, तर वर्ष २०२३ मध्ये ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या झाल्याप्रकरणी ३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सद्यस्थितीत वर्ष २०२१ च्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या अल्प दिसत असली, तरी ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढत आहे.
‘ऑनलाईन रमी’मध्ये पैसे हरल्यामुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली. ‘ऑनलाईन रमी’मध्ये पैसे हरल्यामुळे ठाणे येथील २, तर रायगड आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीने आत्महत्या केली. नाशिकमधील ग्रामीण भागात ‘रौलेट’ नावाच्या जुगारात पैसे हरल्यामुळे २ जणांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी गृहविभागाकडे आहेत.
३ लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये जनजागृती !
‘ऑनलाईन गेम’मधून युवकांची फसवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांकडून राज्यातील १ सहस्र ९५८ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी यांसह ३ लाख ५३ सहस्र ५९१ विद्यार्थी, शिक्षक, पालक यांसह सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती गृहविभागाकडून देण्यात आली.
संपादकीय भूमिका‘ऑनलाईन गेमिंग’ची भयावहता लक्षात घेऊन सरकारने यावर तत्परतेने निर्बंध घालणे आवश्यक आहे ! |