भारताला चीन आणि अमेरिका या देशांच्या श्रेणीत बसवणे अस्वीकारार्ह ! – पीटर लिसे, युरोपियन संसदेचे ज्येष्ठ सदस्य
कार्बन उत्सर्जनाविषयी युरोपियन संसदेचे ज्येष्ठ सदस्य पीटर लिसे यांची स्पष्टोक्ती
बर्लीन – कार्बन उत्सर्जन अल्प करणे, हे जगासमोरील मोठे आव्हान आहे. भारत, अमेरिका आणि चीन यांसारखे देश हे हवामान पालट आणि पर्यावरण वाचववणे यांसारख्या लढाईत अनेकदा एकत्र उभे ठाकलेले दिसतात. असे असले, तरी कार्बन उत्सर्जनाच्या विषयी भारताला चीन आणि अमेरिका यांसारख्या देशांच्या श्रेणीत समाविष्ट करणे अस्वीकारार्ह आहे, असे युरोपियन संसदेचे ज्येष्ठ सदस्य पीटर लिसे यांनी म्हटले आहे. संयुत अरब अमिरातीच्या दुबई येथे ‘संयुक्त राष्ट्र जलवायू वार्ता’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
पीटर लिसे म्हणाले की
१. भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन ‘अत्यंत अल्प’ आहे. त्यामुळे दरडोई कार्बन उत्सर्जन अधिक असलेल्या अमेरिका आणि चीन यांसारख्या देशांच्या सूचीत भारताचा समावेश केला जाऊ शकत नाही.
२. विकसित देशांमधील हवामान आणि पर्यावरणीय परिस्थिती भारतापेक्षा पुष्कळ वेगळी आहे. युरोपमधील बरेच लोक चीन आणि भारत यांना एकाच श्रेणीमध्ये ठेवतात. हे आखाती देशांनाही पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.
३. या आठवड्याच्या प्रारंभी वैज्ञानिकांच्या एका जागतिक पथकाने अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार भारताचे दरडोई २ टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन असून हे जागतिक सरासरीच्या निम्म्याहून अल्प आहे.
४. शास्त्रज्ञांनी सांगितले की, दरडोई कार्बन उत्सर्जनात अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्यामागोमाग जपान, चीन आणि युरोपीय युनियनमधील देश यांचा क्रमांक लागतो.