राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून महाराष्ट्रात ४३ ठिकाणी धाडी !
|
मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ४४ ठिकाणी धाडी घातल्या. यात महाराष्ट्रात ४३ ठिकाणी घातलेल्या धाडींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदर १ अशा ठिकाणांचा समावेश आहे. राज्य आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी संयुक्तपणे केलेली कारवाई अतिशय मोठी आहे. या संपूर्ण कारवाईत १५ जणांना अटक करण्यात आली असून शाकिब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सुसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखनिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राझील नाचन, शकूब दिवकर, कासीफ बेलारे आणि मुंझिर केपी अशी त्यांची नावे आहेत.
सौजन्य इंडिया टूडे
पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा येथेही धाडी !
मीरा-भाईंदर परिसरातील धाडीत २ भ्रमणभाष जप्त करण्यात आले आहेत. कोंढवा (पुणे) येथील तालाब फॅक्टरी येथील शोएब अली शेख याच्या घरी धाड घालण्यात आली. यात यंत्रणेने १ भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष कह्यात घेतला आहे. मोमीनपुरा (पुणे) येथील अन्वर अली याच्या घरी घातलेल्या धाडीत भ्रमणभाष, भ्रमणसंगणक आणि एक सत्तूर कह्यात घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या माध्यमातून या धाडी घालण्यात आल्या. पडघा (भिवंडी) येथून यंत्रणेने ७ ते ८ जणांना कह्यात घेतले आहे. पडघा हे गाव यंत्रणेचे लक्ष्य होते. तेथे सर्वांत मोठी कारवाई झाली आहे.
या कारवाईच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आतंकवादी जाळे आणि इसिसच्या हस्तकांशी संबंधांचा कट उघड होणार असल्याचे समजते. भारतात इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी गुंतलेल्या एका सूत्रधाराचा यात समावेश होता.