जागेचे आरक्षण पालटण्यात न आल्यामुळे मीरा भाईंदर येथील कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम रखडले !
नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – मीरा भाईंदर महापालिकाक्षेत्रांमध्ये कर्करोग रुग्णालयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महानगरपालिकेकडून सिद्ध करण्यात आला आहे; परंतु जागेवरील आरक्षण पालटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे रुग्णालय बांधण्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात येईल. आरक्षण पालटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ मास लागतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये या रुग्णालयाचे भूमीपूजन करण्यात आले होते. या रुग्णालयासाठी १३४ कोटी रुपये शासनाकडून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले होते; परंतु भूमीपूजन होऊन ६ मास उलटूनही रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून रुग्णालयाच्या बांधकामाला प्रारंभ करावा, यासाठी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती.
मीरा भाईंदर शहराच्या विकास योजनेत दवाखाना, प्रसूतीगृह, सामाजिक भवन आणि वाचनालय यांसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली आहे. कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी पूर्वीच्या आरक्षणांमध्ये पालट करणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाकर्करोग रुग्णालयाचे बांधकाम भूमीपूजन होऊनही ६ मास रखडणे, ही प्रशासनाची असंवेदनशीलता दर्शवते ! |