स्वदेशी ‘तापस’ ड्रोनऐवजी भारताकडून इस्रायलच्या ड्रोनची खरेदी !
‘भारताची ‘डी.आर्.डी.ओ.’(संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ‘तापस’ ड्रोनची निर्मिती करत आहे. त्याऐवजी भारत त्याच्या सशस्त्र सैन्य दलांसाठी इस्रायलकडून ‘हर्मिस ९००’ नावाचे ड्रोन खरेदी करत असल्याची माहिती आहे. भारताने देशात विकसित झालेली शस्त्रसामुग्री खरेदी करण्याचा निश्चय केला असतांना इस्रायलकडून ‘हर्मिस ९००’ नावाचे ड्रोन का खरेदी करण्यात येत आहेत ? याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केलेले विश्लेषण पाहूया.
१. स्वदेशी ‘तापस’ ड्रोन सैन्यदलाच्या चाचणीमध्ये अपयशी
भारताची ‘डी.आर्.डी.ओ.’ ही ‘तापस’ ड्रोन (मानवरहित हवाई विमान) बनवत आहे. या ड्रोनची निर्मिती वर्ष २०१० पासून चालू झाली होती आणि ते गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतीय सैन्य दलाला चाचणीसाठी देण्यात आले होते. चाचणी झाली, तेव्हा त्यात ३ मोठ्या त्रुटी आढळून आल्या. त्या पुढीलप्रमाणे :
अ. एक त्याचे वजन अधिक होते.
आ. दुसरे त्याचा आकार मोठा होता. त्यामुळे शत्रूला ते आरामात पाडता आले असते.
इ. तिसरे आकाशात उडत रहाण्याची त्याची क्षमता अपेक्षेहून अल्प होती.
‘तापस’ हे ‘मिडियम हाय अल्टिट्यूड ड्रोन’ आहे, म्हणजे २५ ते ३० सहस्र फुटांवर उडाण करत असतांना ते विविध कामे करू शकेल. उदाहरणार्थ त्याने छायाचित्रकांसह टेहेळणी केली पाहिजे, त्याच्यावर क्षेपणास्त्रेही बसवली जाऊ शकतात. त्यामुळे ते ३०० किलो वजन घेऊन कार्यक्षम राहिले पाहिजे. अशा काही मागण्या सैन्याकडून होत्या; परंतु ऑक्टोबरमध्ये झालेल्या चाचणीमध्ये त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
२. ‘डी.आर्.डी.ओ.’कडून ‘तापस’ ड्रोनऐवजी ‘आर्चर एन्.जी.’ ड्रोनची निर्मिती
‘तापस’ला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ‘डी.आर्.डी.ओ.’ हे ‘तापस’ ड्रोनची निर्मिती करण्याऐवजी त्याच्याकडील ‘आर्चर एन्.जी.’ हे ड्रोन निर्माण करत आहे. येत्या २-३ वर्षांत त्याची चाचणी होईल आणि नंतर त्याचा सैन्यात समावेश येईल. याचा अर्थ सध्याच्या काळात भारताकहे ‘मिडीयम हाय अल्टिट्यूड’ ड्रोन उपलब्ध नाही.
३. इस्रायलकडून ‘हर्मिस ९००’ ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय
त्यामुळे अचानक आपत्कालीन परिस्थितीत ड्रोनच्या साहाय्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ (लक्ष्यित आक्रमण) करायची वेळ आली, तर तात्काळ कारवाईसाठी स्वदेशी ड्रोन उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे ते उपलब्ध होईपर्यंत मधल्या कालावधीत ड्रोनची आवश्यकता लागू शकते. त्यासाठी भारत इस्रायलकडून ‘हर्मिस ९००’ हे ड्रोन खरेदी करत आहे. हे ड्रोन पुढील १ ते २ वर्षांत भारतीय सैन्य दलात समाविष्ट होतील. या ड्रोनने हमास युद्धात पुष्कळ चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता सिद्ध झालेली आहे. ‘हर्मिस ९००’ खरेदी केल्याने भारताला सुसज्ज ड्रोन मिळणार आहेत. याचा अर्थ ‘भारताचा स्वदेशी कार्यक्रम बंद होणार’, असे नाही. अचानक उद्भवणार्या परिस्थितीत सिद्धता ठेवण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे. स्वदेशी ड्रोन भारताच्या तिन्ही दलांनी संमत केल्यानंतर ते वापरता येतील. शस्त्रसज्जता असणे, हे कधीही चांगले आहे; कारण कधी आणि केव्हा काय होईल ?, हे कुणीही सांगू शकत नाही.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.