वीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या काँग्रेसचा भाजपकडून निषेध !

नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विरोधात ८ डिसेंबर या दिवशी विधीमंडळ इमारतीच्या पायर्‍यांवर भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मी विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर यांचे योगदान काय? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली? ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल, त्यांचा फोटो नको. त्यामुळे सावरकरांचे चित्र विधानसभेत नसावे, असे वक्तव्य केले. या विरोधात भाजपच्या आमदारांनी ‘स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणार्‍यांचा निषेध’ या घोषणेने काँग्रेसचा निषेध केला. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कालिदास कोळंबकर, आशिष शेलार, योगेश सागर, अमित साटम, राम कदम यांसह अन्यही आमदार आंदोलनात सहभागी झाले होते.