पू. (सौ.) अश्विनीताई, तुझा सत्संग मला देवच मिळवून देतो ।

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ८.१२.२०२३ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधिकेने अर्पण केलेले काव्य येथे देत आहोत. 

पू. (सौ.) अश्विनी पवार
सौ. अनुश्री साळुंके

तुझ्याशी बोलतांना मला वेळेचे भानच उरत नाही ।
‘मनाची निर्विचार स्थिती कशी होते ?’,
हेच मला कळत नाही ।। १ ।।

तुझ्याशी बोलतांना ‘काळाला थांबवून
प्रत्येक क्षण हृदयात साठवून ठेवावा’, असे वाटते ।
पण ‘हे सगळे कसे करायचे ?’ हेच मला कळत नाही ।। २ ।।

एक एक शब्द तुझा अंतःकरणापर्यंत पोचतो ।
हे तुझे वैशिष्ट्य देवच मला लक्षात आणून देतो ।। ३ ।।

‘तू आठवण काढतेस, तेव्हा देवच आठवण काढतो’,
या विचाराने माझा भाव जागृत होतो ।
तुझ्याशी बोलतांना ‘मी कुठे कमी पडते’,
हे देवच मला लक्षात आणून देतो ।। ४ ।।

तू माझ्याशी बोलतेस आणि मला बघतेस,
तेव्हा माझ्यावरचे आवरण दूर होते ।
‘ही प्रक्रिया नक्की कशी होते ?’ हे माझा देवच जाणतो ।। ५ ।।

तुझ्या शब्दांत आणि बघण्यात एवढे चैतन्य कसे ?
हे संतांचे बुद्धीपलीकडील वैशिष्ट्य
देवच मला शिकवतो ।।  ६ ।।

पात्रता माझी नसतांना तुझा सत्संग मिळवून देतो ।
असा हा माझा देव माझ्यावर खूपच कृपा करतो ।। ७ ।।

अनमोल तुझा वेळ आहे, तरी तुझा सत्संग
मला देवच मिळवून देतो ।
कृतज्ञता तरी कशी व्यक्त करावी,
याचाच मला संभ्रम पडतो ।। ८ ।।

देव माझ्यावर करत असलेल्या अपार कृपेविषयी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ।

– सौ. अनुश्री साळुंके, (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), फोंडा, गोवा.