‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे संस्कृती नष्ट होत असल्याने त्यावर बंदी घालणारा कायदा करा !
भाजपचे खासदार धर्मवीर सिंह यांची लोकसभेत मागणी
नवी देहली – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मुळे देशाची संस्कृती नष्ट होत आहे. ते बेकायदेशीर ठरवण्यात यावे. देशात ‘लिव्ह-इन’ संबंधांवर बंदी घालण्यासाठी सरकारने कायदा करावा आणि प्रेमविवाहात पालकांची संमती अनिवार्य करावी, अशी मागणी हरियाणाच्या भिवान-महेंद्रगडमधील भाजपचे खासदार धर्मवीर सिंह यांनी लोकसभेत केली.
सिंह पुढे म्हणाले की, भारतीय समाजात पारंपरिकपणे कुटुंबांच्या माध्यमातून विवाह निश्चित केले जातात, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचीही संमती असते. गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांप्रमाणे भारतात घटस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या देशांप्रमाणे भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत. हे असेच चालू राहिल्यास, ज्या संस्कृतीसाठी आपण ओळखले जातो, ती एक दिवस संपुष्टात येईल.