पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग : ७ जणांचा होरपळून मृत्यू !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर आणखी काही कामगार त्यात अडकल्याचे बोलले जात आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना चालू होते. (विनापरवाना गोदामाविषयी प्रशासनाला काहीच थांगपत्ता नव्हता कि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ?, याची चौकशी होऊन सत्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे ! – संपादक) या आगीवर अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी नियंत्रण मिळवले. सायंकाळपर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. आणखी कामगारांचा शोध चालू आहे. वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणार्या फुलझडी मेणबत्तीचा हा कारखाना होता. या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या कारखान्यात २५ कामगार काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
सौजन्य झी 24 तास
पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस घटनास्थळी आले असून बचाव कार्य चालू आहे. काही कामगार गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना वाय.सी.एम्. रुग्णालयात नेले आहे.