आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ʻक्विक रेस्पॉन्स सिस्टमʼ कार्यरत करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुंबई, ८ डिसेंबर (वार्ता.) – गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करून आरोपी विदेशात पळून जाण्याच्या घटना सर्वच राज्यांत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यासाठीचे ‘ॲप’ विदेशातून चालवले जात आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही याचे जाळे पसरले आहे. अशा प्रकारचे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत ʻक्विक रेस्पॉन्स सिस्टमʼ सिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

’क्विक रेस्पॉन्स सिस्टमʼ विषयी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांतील पोलीस महासंचालकांसमवेत बैठक घेतली आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत ‘डिजीटल प्लॅटफर्म’ सिद्ध करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर ४-५ पोलीस आयुक्तांचा समावेश करून हा ‘डिजीटल प्लॅटफॉर्म’ सिद्ध करण्यात येईल. त्यानंतर याचा विस्तार करण्यात येईल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर आणि सांगली येथील गुंतवणूकदारांची ‘ए.एस्.ट्रेडर्स’ यासह अन्य काही आस्थापनांकडून ३९८ गुंतवणूकदारांची ४० कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणूकदारांची फसवणूक करून आरोपी विदेशात पळून गेल्याचा तारांकित प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी वरील उत्तरे दिली. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणात ३५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांतील १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले असून अन्वेषणानंतर पुढील आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अशा प्रकारचे गुन्ह्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी केंद्र सरकारही कारवाई करत आहेत.’’

‘डीपफेक’विषयी जनजागृती आवश्यक !

‘राजकीय नेत्यांसमवेत छायाचित्रे काढून त्यांच्या जवळचे आहोत’, असे दाखवून जनतेची फसवणूक केली जाऊ शकते. सद्यस्थितीत ‘डीपफेक’ करून कुणासमवेतही कुणाचे छायाचित्र जोडता येते. याविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे’, असे या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.