चुकीची वीजदेयके टाळण्यासाठी राज्यात लवकरच ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील ! – देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात मोठ्या प्रमाणात चुकीची वीजदेयके दिली जात आहे. वर्ष २०२२ मध्ये १४ लाख १४ सहस्र वीजमीटरची चुकीची देयके दिली गेली. वर्ष २०२३ मध्ये चुकीची देयके देण्याची सरासरी ७ लाखांपर्यंत न्यून करण्यात यश आले आहे. चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी लवकरच राज्यात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

१. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात अवास्तव घरगुती वीजदेयके आकारण्यात आल्याचा तारांकित प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी सभागृहात उपस्थित केला होता. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी निकोले यांनी केली.

२. मीटरची प्रत्यक्ष नोंद न घेता एका व्यक्तीला १ लाख रुपयांचे वीजदेयक पाठवण्यात आले. पडताळणी केली असता वीजदेयक २८ सहस्र रुपये असल्याचे आढळून आले. तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीला अतिरिक्त पैसे परत करण्यात आले. या प्रकरणी एजन्सी देण्यात आलेल्या आस्थापनावर कारवाई करण्यात आली आहे.

३. आणखी कुणाला वाढीव वीजदेयके देण्यात आली असतील, त्यांना रक्कम अल्प करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

४. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्रशासनाकडून ‘स्मार्ट मीटर’साठी अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्रात यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

आमदार आशिष जैस्वाल यांनी वीजदेयकांची रचना सर्वसामान्यांना समजेल अशी सुलभ करण्याची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची सूचना देण्यास आमदार आशिष जैस्वाल यांना सांगितले.