सांगली सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधांसाठी १० कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान देऊ ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
विधान परिषद प्रश्नोत्तरे…
नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) – सांगली सामान्य (सिव्हिल) रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. ही दोन्ही यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले होते; मात्र या दोन्ही यंत्रांसाठी एकूण १० कोटी ३० लाख रुपयांचा व्यय आहे. त्यामुळे ८ कोटी रुपये परत शासनाकडे आले होते. आता सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन २-३ मासांत १० कोटी ३० लाख रुपयांचा निधी देऊन सिटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. हे दोन्ही यंत्रे खरेदी केली जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नोत्तरात दिली. सदस्य प्रवीण दटके यांनी हा प्रश्न विचारला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, जयंत आजगावकर यांनी भाग घेतला.
प्रवीण दटके म्हणाले की, सांगली सिव्हिल रुग्णालयात केवळ ४०० खाटांची सुविधा असून तेथे सांगली जिल्हा, उत्तर कर्नाटक, कोकण, सांगोला (जिल्हा सोलापूर), जयसिंगपूर, शिरोळ आणि इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) इत्यादी परिसरांतील रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे त्यामानाने तेथे वैद्यकीय साधनसामुग्री अल्प आहे. वरील दोन्ही यंत्रे नसल्याने रुग्णांची तपासणी करण्यासाठी गैरसोय होत आहे. यासाठी तेथे सिटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. या वेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सिव्हिल रुग्णालय सांगली ही संस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज या संस्थेशी संलग्नित असल्याने तेथे सर्व तपासण्या करण्यात येतात.