Israel Hezbollah War : बैरूत शहराला गाझा बनवणार ! – नेतान्याहू यांची लेबनॉनला धमकी
तेल अविव (इस्रायल) – लेबनॉनमधून इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर आक्रमणे केले जात आहेत. येथील आतंकवादी संघटना हिजबुल्लाने इस्रायलच्या सीमेत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे डागली. यात इस्रायलच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला. यावरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हिजबुल्ला याला धमकी दिली. ते म्हणाले की, लेबनॉनकडून होणारी आक्रमणे थांबली नाही, तर इस्रायली सैन्य गाझाप्रमाणे लेबनॉनची राजधानी बेरूत शहर उद्ध्वस्त करेल.
सौजन्य: WION
हमासच्या अनेक आतंकवाद्यांनी पत्करली शरणागती !
हमासच्या आतंकवाद्यांचे केवळ अंतर्वस्त्र घातलेले, डोळ्यावर पट्टी आणि हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत वाळवंटात बसवण्यात आल्याचे अन् मागे इस्रायली सैनिक उभे असल्याचे छायाचित्र प्रसारित झाले आहे. यावर इस्रायलने गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना ओलीस ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे; मात्र हमासच्या आतंकवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. ही शरणागती जबेलिया भागात पत्कारण्यात आली आहे.
गाझामध्ये आतापर्यंत १७ हजारांहून अधिक लोक ठार !
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला की, इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत एकूण १७ सहस्र १७७ लोक मारले गेले आहेत, तर ४६ सहस्र लोक घायाळ झाले आहेत.
अमेरिकेतील ज्यू मंदिराबाहेर गोळीबार !
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये एका व्यक्तीने ज्यू मंदिराबाहेर गोळीबार केला. या वेळी तो पॅलेस्टाईनला मुक्त करण्याची घोषणा देत होता. त्याला अटक करण्यात आली आहे. या गोळीबारात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. याविषयी येथील गव्हर्नर कॅथी हॉचुल म्हणाल्या की, आरोपीचे वय २८ वर्षे आहे. तो स्थानिक रहिवासी असून गाझावरील इस्रायलच्या आक्रमणामुळे तो दु:खी झाला होता.