राज्यशासन शेतकर्यांच्या पाठीशी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – केंद्रशासनाच्या निकषानुसार महाराष्ट्रातील ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. अन्यही काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे; परंतु राज्य सरकार दुष्काळसदृश स्थिती असलेल्या शेतकर्यांनाही हानीभरपाई देणार आहे. आतापर्यंत दुष्काळग्रस्त भागात हानीभरपाई म्हणून १० सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हानीभरपाई देण्यासाठी २ हेक्टरचा निकष ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या हानीविषयी विधानसभेत स्थगन प्रस्ताव उपस्थित करण्यासाठी अध्यक्षांकडे अनुमती मागितली होती. वडेट्टीवार यांनी शेतकर्यांना हानीभरपाई देण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.