संपादकीय : काँग्रेसचे पुन्हा वस्त्रहरण !
‘सत्य फार काळ लपून रहात नाही, ते कधी ना कधी उघड होतेच’, याचा अनुभव या देशात काँग्रेसपेक्षा अधिक अन्य कुणी घेतला नसावा. काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात जनतेला अंधारात ठेवून जो खोटारडेपणा केला, तो तिचे नेतेच अलीकडे समोर आणू लागले आहेत. काँग्रेसच्या वर्ष २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीतील राजवटीचे सविस्तर विश्लेषण काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या ‘प्रणब, माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ या आगामी पुस्तकात केले आहे. शर्मिष्ठा मुखर्जी या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या या पुस्तकाचे ११ डिसेंबरला प्रकाशन झाल्यावर आणखीही अनेक धक्कादायक खुलासे होतीलच. समोर आलेल्या माहितीनुसार प्रणव मुखर्जी यांना राहुल गांधी यांची राजकीय अपरिपक्वता खटकणारी होती. मुखर्जी राष्ट्रपती असतांना त्यांना चुकीच्या वेळेत भेटायला येणार्या राहुल गांधींवर ते चांगलेच चिडले होते. ‘ज्या राहुल गांधी यांच्या कार्यालयाला सकाळ आणि संध्याकाळ यांतील भेद कळत नाही, ते पंतप्रधान कार्यालय काय चालवणार ?’, असे संतप्त उद्गार त्यांनी काढले होते. याखेरीज राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय मंत्रीमंडळाचा अध्यादेश फाडल्याच्या कृतीवरही प्रणव मुखर्जी प्रचंड क्रोधित झाले होते.
या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकात आहे. ‘काँग्रेसची पदावरील व्यक्ती ही नामधारी असते, सर्व निर्णय ‘वरून’च होतात’, असाही सूर या पुस्तकात असल्याचे सांगण्यात येते. थोडक्यात मुखर्जी यांनी काँग्रेसचे वस्त्रहरणच केले आहे. साधारण १० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हाताखाली काम केलेले सनदी अधिकारी संजय बारू यांनीही ‘दी ॲक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ हे पुस्तक लिहून ‘डॉ. सिंह हे केवळ नामधारी होते आणि सर्व निर्णय ‘वरून’ घेतले जायचे’, हे उघड केले होते. म्हणजे बारू यांनीही काँग्रेसचे तेव्हा वस्त्रहरण केले होते. सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ‘नेहरूंच्या चुकांमुळेच पाकव्याप्त काश्मीर बनले’, असे सांगून काँग्रेसचे वस्त्रहरण केले. अर्थात् अगोदरच ‘कमरेचे सोडून डोक्याला बांधलेल्यांना लाज कसली ?’, अशी काँग्रेसची गत झाली आहे. अशी काँग्रेस आता राजकीयदृष्ट्या विसर्जित करण्यातच समाजिहत आहे !